• Fri. Jul 3rd, 2026

    तीन अपत्य असतानाही भाजप उमेदवाराचा अर्ज वैध ठरवल्याचा आरोप, उच्च न्यायालयात सुनावणी होणार

    ByMH LIVE NEWS

    Jan 24, 2026
    तीन अपत्य असतानाही भाजप उमेदवाराचा अर्ज वैध ठरवल्याचा आरोप, उच्च न्यायालयात सुनावणी होणार

    सातारा 

    तीन अपत्य असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दबावामुळे सैदापूर गटातील भाजप उमेदवार सागर शिवदास यांचा अर्ज वैध ठरवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार नरहरी जानराव यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच त्या निर्णयाच्या विरोधात जानराव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील सैदापूर जिल्हा परिषद गटात मोठा पेच निर्माण झाला आहे. उच्च न्यायालय मंगळवारी काय निर्णय देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    कराड तालुक्यातील सैदापूर जिल्हा परिषद गटात भाजपमधून सागर शिवदास यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१७ च्या निवडणुकीत ते भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर आता पुन्हा आरक्षणाने त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या विरोधात नरहरी जानराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तीन अपत्य असल्याने शिवदास यांच्या अर्जावर जानराव यांनी छाननीवेळी हरकत घेतली होती. कराडचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या समोर बुधवारी (२१ जानेवारी) दोन्ही बाजुच्या वकीलांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सागर शिवदास यांचा अर्ज वैध ठरवला. तो निर्णय दुसऱ्या दिवशी (गुरूवारी) जाहीर केला.

    निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाची प्रत हाती आल्यानंतर अपक्ष उमेदवार नरहरी जानराव यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. जानराव म्हणाले की, “भाजपचे उमेदवार सागर शिवदास यांना तीन अपत्ये असल्याचे जन्म दाखले आणि मुलांच्या शैक्षणिक प्रवेश नोंदीचे ठोस पुरावे सादर केले होते. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरले नाहीत.”
    उमेदवारी कायम राहण्यासाठी भाजप उमेदवाराने आपली एक मुलगी मयत असल्याचे सांगितले. लोकशाहीत हा प्रकार लांच्छनास्पद असल्याचे नरहरी जानराव म्हणाले. दरम्यान, तीन अपत्याच्या संदर्भात निर्णय देण्याचा मला अधिकार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकालात म्हटले आहे. या प्रक्रियेत राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याने प्रशासनावर मोठा दबाव आल्याचा खळबळजनक आरोपही नरहरी जानराव यांनी केला.

    “अर्ज छाननीच्या दिवशीच आमच्या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी दुसऱ्या दिवशी निर्णय दिला. शनिवार ते सोमवार, असे तीन दिवस सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळे आम्हाला अपील करता येऊ नये, म्हणून संपूर्ण प्रक्रिया विलंबाने केली. निकालाची कागदपत्रे लवकर दिली नाहीत”, असाही आरोप नरहरी जानराव यांनी केले.

    यासंदर्भात भाजप उमेदवार सागर शिवदास यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले की, “हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले आहे. माझ्यावर केलेले आरोप निरर्थक आहेत. माझ्या विरोधात उमेदवार मिळत नसल्याने विरोधकांनी माझी बदनामी सुरू केली आहे. आम्ही आमची बाजू उच्च न्यायालयात मांडू.” दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed