Beed Accident News : बीडमध्ये दोन तरुण शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कृषी पदर्शनावरुन परत येताना अपघातात त्यांचं निधन झालं.
दिवसभर प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेटी देऊन, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊन ते त्याच दिवशी रात्री आपल्या गावाकडे परतत होते. रात्रीच्या सुमारास जामखेड-श्रीगोंदा रोडवरील मिरजगाव जवळ एका पुलावर त्यांची दुचाकी आली असताना, समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची हूल दिली. या गोंधळात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी पुलावरून थेट खाली कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचीही प्राणज्योत मालवली.
Beed News : पत्नीचं आजारपण आणि कर्जाचा वाढता डोंगर; हतबल शेतकऱ्याने आयुष्य संपवलं, कुटुंबाचा आधार हरपला, गावात हळहळ
केळीच्या बागेचे स्वप्न अधुरेच राहिले
श्रीकांत आणि महेश हे दोघेही शेतकरी कुटुंबातील कष्टाळू मुले होती. आपल्या शेतात केवळ पारंपरिक पिके न घेता, आधुनिक पद्धतीने केळीची बाग फुलवण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. केळी लागवडीचे तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची माहिती घेण्यासाठीच त्यांनी खास बारामती गाठली होती. मात्र, प्रगत शेतीचे स्वप्न डोळ्यात घेऊन घरी परतणाऱ्या या तरुणांवर काळाने घाला घातला, दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
डंपरचा अपघात, कुटुंबाचा आक्रोश… पोलिसांनी सांगितलं पुणे अपघाताचं वास्तव
गावावर शोककळा पसरली
या दोन्ही तरुणांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी, वनवेवाडी मातकुळी ता. आष्टी जिल्हा बीड येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी गावातील दोन उमद्या तरुणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही तरुण नात्याने भाऊ लागत असल्याने खांबकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
