छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घातला. शिवसेना आणि भाजपची युती करु नका, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनरमध्ये महायुतीची बैठक पार पडली. महापालिका निवडणुकांच्या वेळी महायुतीच्या दोन्ही पक्षांच्या तब्बल 12 बैठका झाल्यानंतरही अंतिम क्षणी युती तुटली होती. या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं. तर शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही. यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. छत्रपती संभाजीनगरच्या कीज हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर युतीची घोषणा झाली अन् भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले.
भाजपच्या वतीने मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर बैठकीला उपस्थित होते. तर शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरणारे, आमदार संजना जाधव उपस्थित होते. दोन्ही पक्षांच्या बैठकीनंतर युतीची घोषणा करण्यात आली. पण वैजापूरच्या भाजप कार्यकर्त्यांचा युतीला विरोध आहे. युती तोडा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत युती तोडण्याची मागणी केली.
अतुल सावे आणि संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. भाजपला 27 तर शिवसेनेला 25 जागा मिळाल्या आहेत. पण असं असलं तरी भाजप कार्यकर्त्यांनी युती झाली म्हणून नाराजी व्यक्त केली. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी मोठा गोंधळ करण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून जास्त जागांची मागणी केली जात होती. महायुतीच्या बैठकीवेळी जागावाटपाची चर्चा सुरु असताना संजय शिरसाट हे चिडून बैठकीतून बाहेर आले होते. पण शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांनी बाहेर येत त्यांची समजूत काढली आणि परत बैठकीत नेल्याची चर्चा आहे. अशा वातावरणात ही बैठक झाली. यानंतर युतीची घोषणा झाली. पण भाजप कार्यकर्त्यांचा युतीला विरोध आहे.
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. भाजपचे सगळे प्रमुख नेते होते. त्याचा काही विषय नाही. आमची फक्त एकच जागा म्हणजे बिडकीची गेलेली आहे. आमचा प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. पण युती म्हटलं की, कुठेतरी मागेपुढे होतं. कार्यकर्त्याची इच्छा असते. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे, अशी प्रतिक्रिया संदीपान भुमरे यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा