Nashik Shubham Vyapari Case: नाशिकच्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांच्या निधनानंतर बेपत्ता असलेल्या २१ वर्षीय शुभम व्यापारीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वडिलांच्या अपघाती निधनानंतर शुभम होता तणावात
मिळालेल्या माहितीनुसार, शुभमचे वडील बाळासाहेब व्यापारी यांचा काही दिवसांपूर्वीच भीषण अपघातात मृत्यू झाला होता. घराचा आधारवड गेल्याने व्यापारी कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडले होते. वडिलांच्या जाण्याने शुभम प्रचंड मानसिक धक्क्यात आणि तणावात होता. याच नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बेपत्ता शुभमचा शोध विहिरीत संपला
वडिलांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांतच शुभम घरातून बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे विचारणा केली, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अशातच १९ जानेवारी रोजी हांडे मळा परिसरातील एका विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि ओळख पटवली असता, तो बेपत्ता शुभम व्यापारी असल्याचे निष्पन्न झाले.
Jaykumar Gore vs Praniti Shinde: ‘बापाने काँग्रेस वाढवली, पोरीने वाटोळं केलं’; जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंवर पुन्हा डागली तोफ
घातपात की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरू
शुभमचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप गूढ कायम आहे. वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास अंबड पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तूर्तास ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे.
व्यापारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर
एकाच महिन्यात बाप आणि लेकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने व्यापारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या २१ वर्षांच्या तरुणाने अशा प्रकारे जगाचा निरोप घेतल्याने सिडको परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त होत आहे.
