उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगणात शिवसेनेचे माजी महापौर आणि पाच टर्म नगरसेवक राहिलेल्या उमेदवाराचा पराभव करणारा ‘उबाठा’चा शिलेदार शहाजी खुस्पे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांचा ‘शुभदिप’ बंगला ज्या प्रभागात आहे, शिंदे स्वत: ज्या प्रभागात राहतात तिथे शिंदेंच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे ज्या उमेदवाराचा पराभव झाला तो काही साधासुधा उमेदवार नव्हता. तर ते होते अशोक वैती. अशोक वैती हे ठाणे महापालिकेचे माजी महापौर आहेत. ते तब्बल पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा विजय खूप खास आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षसंघटनेला बळकट करणारा हा विजय आहे. शहाजी खुस्पे असं ठाकरे गटाच्या विजयी उमेदवाराचे नाव आहे.
शहाजी खुस्पे यांनी ही निवडणूक जिंकल्यामुळे राज्यभरात ते प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. खुस्पे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. खुस्पे यांनी आज थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जावून भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी त्यांची विचारपूस केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी खुस्पे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
Pune News : दोन्ही राष्ट्रवादीत काहीतरी मोठं घडतंय, रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला
प्रभाग क्रमांक १३ ची रचना ही काजूवाडी, वैतीवाडी, रामचंद्र नगर, साईनाथ नगर, ज्ञानेश्वर नगर अशा परिसराचा मिळून होते. या प्रभागात गेल्या 25 ते 30 वर्षांपासून अशोक वैती यांची ताकद आहे. त्यांचे तिथे प्राबल्य आहे. तसेच ठाण्याचे शिवसेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नेत्यांपैकी एक असल्याचं मानले जाते. ते ठाणे महापालिकेचे माजी महापौर, माजी सभागृह नेते आणि पक्षाचे ठाणे शहरप्रमुख आहे. असं असताना खुस्पे यांनी त्यांचा पराभव करणं ही खूप मोठी गोष्टी मानली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकजूनही खुस्पे यांचं कौतुक केलं जात आहे.
ठाकरेंनी आस्थेने केली विचारपूस
खुस्पे यांच्या विजयी रणनीतीबाबत ठाकरे यांनी चर्चा केली. तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानही केला. निष्ठेची लढाई यापुढे अशीच लढत राहा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी खुस्पे यांना दिली. या प्रभागातून शिवसेनेच्या पॅनलला कडवी झुंज देणारे संजय दळवी, वैशाली घाटवळ, अनिला हिंगे आणि त्यांचे पती अमोल हिंगे यांचेही ठाकरे यांनी कौतुक केले.
