Maharashtra Municipal Election: मतदारांच्या बोटावरची शाई पुसून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई होईल. राज्य निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केले आहे. एकदा मतदान नोंदवल्यानंतर शाई पुसून पुन्हा मतदान करता येत नाही.
बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.
Maharashtra Municipal Election: काढा ते आधी! प्रचार करताय का इथे? भाजपच्या पोलिंग एजंटमुळे वाद; राज ठाकरेंचा शिलेदार एकटा भिडला
मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ रोजी आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
मुंबईसह २९ महापालिकांंसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत. पण मतदानानंतर अवघ्या काही तासांमध्ये बोटाला लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. थीनर, नेलपेंट रिमूव्हर, सॅनिटायझरचा वापर करुन बोटावरील शाई पुसली जात आहे. याबद्दलचे व्हिडीओ अनेकांनी शेअर केले आहेत. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या प्रकरणावरुन निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली आहे.
