अकोला महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे मदतीची मागणी केली आहे.
अकोला महापालिकेत शिंदेसेना ८० पैकी ७२ जागांवर लढत आहे. तर वंचित ५४ जागा लढवत आहे. मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना शिंदेसेनेनं मोठा डाव टाकला आहे. शिंदेसेनेनं थेट वंचितकडे मदतीची मागणी केली आहे. वंचित लढवत नसलेल्या जागांवर आम्हाला मदत करा, अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात आली आहे. ‘साम’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
बदलापूर भाजपची पाठ सोडेना; शिंदेंच्या होमपीचवर पुन्हा गोची; स्वपक्षीयांमुळे ‘स्वीकृत’ अडचण
शिंदेसेनेचे नेते संजय राठोडांनी प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि शिंदेसेनेचे नेते प्रतापराव जाधवदेखील अकोल्यात पक्षासाठी किल्ला लढवत आहेत. शिंदेसेना-वंचित यांच्यातील पाठिंब्याचा विषय मार्गी लागल्यास निवडणूक निकालावर त्याचे परिणाम दिसू शकतात. अकोला आंबेडकरांचा बालेकिल्ला मानला जातो. इथून ते लोकसभेवर निवडून गेले होते. लोकसभा निवडणुकांमध्ये अकोल्यात आंबेडकरांना लक्षणीय मतदान होतं.
अकोला जिल्हा गेल्या आठवड्यात अकोट नगरपालिकेमुळे राज्यभर चर्चेत राहिला. अकोटमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं थेट एमआयएमशी युती केली. अकोट विकास मंचची स्थापना करत भाजपनं थेट एमआयएमला सोबत घेतलं. त्यामुळे अकोटची चर्चा देशभर झाली.
भाजपच्या गोटात घडामोडींना वेग, 20 जानेवारी महत्त्वाचा दिवस; मोदी, शहांसह दिग्गज उपस्थित राहणार
अकोल्यात २०१७ मध्ये महापालिकेची अखेरची निवडणूक झाली. त्यात भाजपनं ८० पैकी ४८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. त्याआधी २०१२ मध्ये भाजपला इथे केवळ १८ जागा मिळाल्या होत्या. २०१७ मध्ये अकोल्यात काँग्रेसनं १३, शिवसेनेनं ८, राष्ट्रवादी काँग्रेसनं ५, भारिपनं ३, एमआयएमनं १ आणि अपक्षांनी २ जागा जिंकल्या होत्या.
