Uddhav-Raj Sabha Thane: ठाण्यातील सभेत संजय राऊत यांनी महायुतीवर बोचरी टीका केली. भाजपला सत्तेची मस्ती चढली असून राज-उद्धव ठाकरे ती उतरवतील, असं राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, ठाण्यातील सभेत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणांआधी ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी यावेळी शिंदेच्या सेनेने केलेल्या जाहिरातींवरही आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, “ठाण्यातली लढाई जी आहे ही ती निष्ठावान विरुद्ध बेईमान अशी आहे. आणि आजही ठाण्यामध्ये जे बाळासाहेबांनी निष्ठेचं बीज पेरलं ते तसंच्या तसं मला दिसत आहे. काल शिवतीर्थावर आतापर्यंतची महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात विराट सभा झाली. त्या सभेत उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी जे तडाखे दिले त्या धक्क्यातून मिंधे फडणवीस अद्याप सावरलेले नाहीत आणि आज ही ठाण्याची सभा आहे.”
राऊत पुढे म्हणाले की, “मी आज शांतपणे भाषण करतो आहे, मला.शांतपणे काही थोडक्यात काही गोष्टी सांगायच्या आहेत. अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी काय सांगितलं, भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे. आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हटलो तर त्यांचे प्रवक्ते आमच्यावर तुटून पडतात, पण अजित पवार तुमच्या मंत्रिमंडळातला एक उपमुख्यमंत्री सांगतो आहे की भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे आणि भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही. भाजपला सत्तेची मस्ती आणि माज आणि नशा आली. माज हा शब्द अजित पवारांचा आहे.
Sanjay Raut: ‘सत्तेचा माज उतरवण्याची ताकद राज-उद्धव ठाकरेंमध्ये, त्यांची युती ही…’, संजय राऊत ठाण्यात कडाडले
आता हा माज उतरवायला उद्धव आणि राज आहेत. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिल पाहिजे. माज उतरवण्याचं हत्यार आहे, औषध आहे ते राज आणि उद्धव साहेबांकडे आहे”, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.
“सध्या एक जाहिरात वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळते चोरलेल्या धनुष्यबाणाची. जाहिरात कशी आहे, जगणं झालंय छान. कारण धनुष्यबाण चोरलेला. तसं नसून जगणं झालंय छान, कारण तुम्ही चोरलाय आमचा धनुष्यबाण. हा धनुष्यबाण फार काळ तुमच्याकडे राहणार नाही. बाळासाहेबांचं पुण्य फार मोठं आहे. त्यांच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाण ज्याने चोरला तो अमित शाहाही राजकारणात टिकणार नाही, आणि हा मिंदे सुद्धा राजकारणात टिकणार नाही बेईमान आणि गद्दारांना इथे स्थान नाही”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
युती कधीपर्यंत टीकणार?
यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो, उद्धव आणि राज साहेब एकत्र तर आले, पण ही त्यांची युती किती काळ टिकणार, तुम्हाला संपूर्ण जमिनीत गाडेपर्यंत. तुमचा संपूर्ण नायनाट करून महाराष्ट्रामध्ये नवीन पर्व सुरू करेपर्यंत आम्ही एकत्र आहोत, आणि शेवटपर्यंत एकत्र राहू, आपण अशी साथ आणि समर्थन द्या की यांचा टांगा पलटी झाल्याशिवाय राहणार नाही.”
