नाशिक : नाशिकमध्ये भावाकडूनच भावाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडाऱ्यातील प्रसाद घरी आणण्याच्या कारणाहून वाद होऊन वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन गंभीर झालेल्या लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्या लहानभावाने आपल्या सख्ख्या बहिणीसमोर केली. त्यामुळे बहिणीने फिर्याद दिली आहे.
भंडाऱ्यातील प्रसादावरुन हत्या
दि. 9 जानेवारी शुक्रवारी रोजी दुपारच्या सुमारास संशयित सनी बोरसे (वय 30, रा.सुयोग नगर, आर. टी. ओ.कॉलनी, बोधले नगर, नाशिक पुणे रोड, नाशिक) याने भाऊ योगेश बोरसे याला भंडाऱ्यातील प्रसाद घरी आणल्याच्या कारणाहून वाद घालून, लाथा बुक्याने आणि लाकडी दांडक्याने कपाळ आणि पाठीवर जोराने मारून त्याला जीवे ठार मारले. या प्रकरणी मोलमजुरी करून दोघा भावांसोबत राहणारी त्यांची बहीण रेखा दत्तू बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित सनी बोरसे याला अटक करण्यात आली आहे.
निफाडमध्ये कडाक्याच्या थंडीने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
तालुक्यात थंडी जीवघेणी ठरत असून, देवगाव (ता. निफाड) येथील 22 वर्षीय तरुणाचा थंडीत काकडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. देवगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास समीर दौलत सोनवणे (वय २२) हा तरुण मृतावस्थेत आढळून आला. पोलिसपाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना तत्काळ माहिती दिली. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिथंडीमुळे हृदयविकाराच्या तीव्र झटक्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.