सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारे शिवसेना ठाकरे गट आता वार्डातूनच अपक्षांना पाठिंबा देताना दिसत आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारणात नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेणं हा पक्षाला धक्का आहेच, पण शिंदेच्या गटाच्या जिल्हाप्रमुखांसमोर उभ्या असलेल्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणं म्हणजे ही शिंदेंच्या शिवसेनेसाठीदेखील डोकेदुखी आहे.
राज्यात सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारे विरोधक आता महानगरपालिकेमध्ये चांगलेच आक्रमक दिसून येत आहेत. पण जळगाव शहरात विरोधकांनी माघार घेत सत्ताधाऱ्यांना निवडणूक ही सोपी करून दिलेली आहे. याला कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्या मातोश्रींची शिवसेना ठाकरे गटाची अधिकृत उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने भाजपच्या अंकिता पाटील या निवडून आल्या. म्हणजेच सत्ताधाऱ्यांपुढेच विरोधकांनी सोयीचा राजकारण करून त्यांच्यापुढे नांग्या टाकल्या.
यानंतर आता आणखी हाय व्होल्टेज घडामोडी घडताना दिसत आहेत. वार्ड क्रमांक 5 अ इथे माजी महापौर तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवीण माळी आणि माजी नगरसेवक नरेंद्र अण्णा यांचे पुत्र पियुष पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. मात्र ठाकरे गटाचे प्रवीण माळी यांनी कालच पियुष पाटील यांना पाठिंबा दिल्याने शिवसेना ठाकरे गटाने त्या वार्डातून पळ काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे विष्णू भंगाळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चित्र दिसत आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवाराने अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक ५ अ मधील ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार प्रवीण माळी यांनी अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याआधीच ठाकरे गटाच्या चार उमेदवारांनी माघार घेतलेली असताना, आता मतदानास काही दिवस उरलेले असताना हा निर्णय खळबळजनक ठरला आहे.
या प्रभागात माजी महापौर आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, विष्णू भंगाळे यांना एका महिलेने खडेबोल सुनावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे उमेदवाराने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे भंगाळे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
