Akola Soldier Vaibhav Lahane Martyred : अकोल्याचा सुपूत्र नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आलं आहे. ते कुपवाडामध्ये कार्यरत असताना शहीद झाले आहेत.
‘शहीद जवान अमर रहे’
अकोला जिल्ह्याचे सुपुत्र नायक वैभव श्रीकृष्ण लहाने हे भारतीय सेनेतील 12 मराठा लाईट इन्फंट्री तुकडीत कार्यरत होते. दहशतवाद विरोधी (काउंटर इन्सर्जन्सी) कारवाई दरम्यान जम्मू – काश्मीर मधील कुपवाडा सेक्टर येथे कर्तव्यावर असताना 7 जानेवारी रोजी त्यांना वीरमरण आले. शहीद जवान वैभव लहाने यांच्यावर अकोला जिल्ह्यातील कपिलेश्वर या त्यांच्या मूळगावी सैनिकी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैनिकांनी मानवंदना दिली. तर पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या 3 फैरी झाडून सलामी देत मानवंदना दिली. यावेळी ‘शहीद जवान अमर रहे’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तसेच संपूर्ण गावकऱ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या होत्या.
Kolhapur Political News : कोल्हापूरध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील धनुष्यबाण हाती घेणार
परिवाराच्या डोळ्यात अश्रू
प्रत्येक आई – वडिलांना वाटतं की, आपल्या मुलाने आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवावं आणि शहीद जवान वैभव लहाने यांनी देशासाठी बलिदान दिल्यानं अकोल्यासह देशाचीही मान उंचावली आहे. वैभव यांच्या आई – वडील, भाऊ, बहीण आणि आप्त परिवाराच्या डोळ्यात अश्रू दिसतात, पण देशासाठी वैभव यांनी दिलेल्या बलिदानाने त्यांचीही मान उंचावली आहे. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कुणाल झाल्टे, मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे CHM रामेश्वर पाटील यांच्यासह मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे सैनिक, व वैभव लहाने यांच्या कुटुंबियांनी पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले. जवान वैभव लहाने यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. देशासाठी प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं काही तरी करावं, पण हे सगळ्यांच्या नशिबी नसतं. आपल्या देशाचं रक्षण करत वैभव लहाने यांचं बलिदान सर्वांना प्रेरणा देणारं आहे.
