School Student: शाळेतील शिक्षकांनी तातडीने रोशनीला गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी नेलं. परंतु तिथं उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूल ही शाळा आहे. शाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत 15 वर्षांची इयत्ता दहावी शिकणारी रोशनी गोस्वामी ही विद्यार्थिनी देखील सहभागी झाले.
मॅरेथॉन स्पर्धेत रोशनी हिने उत्कृष्ट प्रदर्शन करत तिसरा क्रमांक पटकावला, मात्र विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच या विद्यार्थिनीवर काळाने घाला घातला. मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करताच रोशनीला मोठ्या प्रमाणात धाप लागली आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ती मैदानात खाली बसली आणि काही क्षणातच बेशुद्ध पडली. शाळेतील शिक्षकांनी तातडीने तिला गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, रोशनी गोस्वामी या विद्यार्थिनीचा शाळेत मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घोलवड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
