• Sun. Mar 8th, 2026

    भाजप उमेदवाराचा अर्ज मागे अन् भाजपच्याच आमदाराची बहीण बिनविरोध विजयी; चक्रावून टाकणारा गेम

    भाजप उमेदवाराचा अर्ज मागे अन् भाजपच्याच आमदाराची बहीण बिनविरोध विजयी; चक्रावून टाकणारा गेम

    Panvel Municipal Election 2026: पनवेल महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मागील निवडणुकीत इथे भाजपनं एकहाती विजय मिळवला आहे. पालिकेवरील सत्ता राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी मुंबई: राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मतदान होण्यापूर्वीच ६६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यातील सर्वाधिक नगरसेवक भाजप चे आहेत. भाजपचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत. पण पनवेल महापालिका निवडणुकीत वेगळंच राजकारण पाहायला मिळालं आहे. सगळीकडे भाजप, शिंदेसेनेच्या विरोधातील उमेदवार माघार घेत असताना पनवेलमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारानं अर्ज मागे घेतला आहे. यामुळे भाजप आमदाराची बहीण विजयी झाली आहे.

    पनवेलमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा शेंडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे नेते विक्रांत पाटील यांची बहीण स्नेहल ढमाले पाटील विजयी झाल्या. विक्रांत पाटील भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. प्रभाग क्रमांक १८ क मधील नाट्यमय घडामोडींमुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे आमदार विक्रांत पाटील यांची बहीण अपक्ष निवडणूक लढवत होती. स्नेहल ढमाले पाटील यांच्या बिनविरोध निवडीनं भाजप कार्यकर्त्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.
    Maharashtra Times70 हजार कोटींचा घोटाळा अन् मोदी-फडणवीसांचा पक्ष; अजितदादा अन् चव्हाणांमध्ये जोरदार जुंपली
    खासदार, आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडाडून विरोध होता. घराणेशाहीला लगाम घालण्यासाठी पक्षानं हे धोरण आखलेलं होतं. पण आमदार विक्रांत पाटील यांनी तरीही त्यांच्या बहिणीला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं. आता त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारालाच माघा घ्यायला लावली. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

    अपक्ष उमेदवार स्नेहा ढमाले यांच्या बिनविरोध निवडीनं भाजपला धक्का बसला आहे. अधिकृत उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडल्याचा आरोप स्थानिक पातळीवर आमदार पाटील यांच्यावर होत आहे. यासंदर्भात भाजपमधील निष्ठावानांचा गट आक्रमक झाला आहे. त्यांच्याकडून आमदार विक्रांत पाटील यांची वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली जाणार असल्याचं कळतं.
    Maharashtra Timesशिंदेंच्या होमपीचवर भाजप सुस्साट; देवाभाऊंच्या शिलेदारानं करुन दाखवलं, मतदानाआधीच मोठा धमाका
    एकीकडे भाजपच्या उमेदवाराला माघार घ्यावी लागली असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असताना दुसरीकडे भाजपचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. पनवेलमध्ये २०१७ मध्ये अखेरची निवडणूक झाली. त्यावेळी महापालिकेत भाजपचे ५१ उमेदवार विजयी झाले होते. एकूण ७८ जागा असलेल्या महापालिकेत भाजपनं अगदी स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. भाजपच्या खालोखाल जागा शेतकरी कामगार पक्षानं जिंकल्या. शेकापनं २३ जागा जिंकल्या होत्या.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा