पुण्यातील महाविकास आघाडीच्या गोटातली मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीच्या आजच्या महत्त्वाच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारली. विशेष म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांना फोन करुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल होते. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला महाविकास आघाडीत निवडणूक लढवण्याची नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच आता ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी देखील कठोर निर्णय घेतला आहे. जागावाटपाच्या बैठकांसाठी आता शरद पवारांच्या नेत्यांना बोलवायचं नाही, असा निर्णय ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घेतल आहे. त्यामुळे पुण्यातील घडामोडींनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
महाविकास आघाडीच्या गोटात आज नेमकं काय घडलं?
महाविकास आघाडीमधील घटकपक्षांना उमेदवारांची यादी तयार करायची आहे. त्या उमेदवारांची नावे निश्चित करुन जाहीर करायची आहे. त्यांना एबी फॉर्म द्यायचे आहे. तसेच उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा काळात महाविकास आघाडीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जागावाटपाचा बैठकीकडे पाठ फिरवली आहे.
मविआतील इतर घटक पक्ष काँग्रेस आणि ठाकरे गट यांची पुण्यातील काँग्रेस भवन येथे बैठक सुरु आहे. तसेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना बैठकीसाठी दोन वेळा निरोप दिला. पण तरीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी बैठकीकडे पाठ दाखवली. यामुळे आता ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी यापुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना यापुढे बैठकीसाठी न बोलवण्याची भूमिका घेतली आहे.
Solapur News : काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवाराचा थेट MIM मध्ये प्रवेश, प्रणिती शिंदेंना मोठा धक्का
ठाकरे गटाकडून पक्षश्रेष्ठांकडे तक्रार
ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांना काल दुपारपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीय. त्यांना वारंवार बैठकीसाठी बोलावलं जात असतानादेखील त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठी असलेल्या खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर कुणाची वाट पाहू नका. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे वाट पाहू नका, पुढे जा, असा आदेश वरिष्ठांनी दिला आहे. त्यामुळे आता शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीत पुण्यात लढणार का? याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झालेला बघायला मिळतोय. तसेच मविआत मनसेला सहभागी केलं जातं का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
