बीड जिल्ह्यातील गेवराई–माजलगाव महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कष्टकरी ऊसतोड मजूर ठार झाला आहे.
शुक्रवारी, २६ डिसेंबर रोजी दिवसभर ऊस तोडणीचे काम आटोपल्यानंतर ते संध्याकाळच्या सुमारास पायी आपल्या घराकडे निघाले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास ते राजुरी मळा परिसरातील महामार्गावरून चालत असताना, गेवराईकडून माजलगावच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एकनाथ पवार यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पवारांना पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
एक ठार तर दुचाकीस्वार गंभीर
या अपघातात एक जण ठार झाला मात्र दुचाकी चालक तुषार चंद्रकांत जगताप (वय २५ वर्षे, रा. शेलू मारफळा) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. धडकेनंतर दुचाकीचा ताबा सुटल्याने ते रस्त्यावर फेकला गेले, ज्यामुळे त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Latur Crime: दारु-सिगारेटसाठी बार मालकाला मध्यरात्री तिघांनी संपवलं? सीसीटीव्ही पाहून वेगळाच संशय, नेमकं काय घडलं?
पोलीस प्रशासनाची कार्यवाही
घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. बीट अंमलदार अंजन गडदे आणि चालक पवन शेळके यांनी तातडीने पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.
परिसरात हळहळ
आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या एका मजुराचा अशा प्रकारे अंत झाल्याने राजुरी मळा परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. महामार्गावर वाढती वाहनांची वर्दळ आणि वेगमर्यादेचे उल्लंघन यामुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचे स्थानिकांनी बोलून दाखवले. या प्रकरणाचा पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहेत.
