Pune NCP News: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, असं एका नेत्याकडून सांगण्यात आलं आहे.
महापालिका निवडणुकीसाठ येत्या एक ते दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. “दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यावर सखोल चर्चा झाली असून, अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. प्रशांत जगताप हे केवळ शहराचे अध्यक्ष आहेत, तर देशाचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवार आहेत. सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वरिष्ठ स्तरावर झालेल्या चर्चेनुसार, घड्याळ या चिन्हावरच पुढील निवडणुका लढवल्या जातील,” असंही धनकवडे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या युतीनंतर दोन्ही पक्ष कोणत्या चिन्हावर निवडणुका लढवतील, याबद्दलही धनकवडे यांनी स्पष्टता दिली. त्यांनी सांगितलं की, “सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची चर्चा झालेली आहे. त्यानुसार घड्याळ या चिन्हावर पुढील निवडणुका लढवल्या जातील.”
भाजपला आव्हान देणार
२०१७ च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने ९७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेस ३९ जागांसह दुसऱ्या स्थानी होती. मात्र, आगामी निवडणुकीसाठी भाजपने स्वबळावर तयारी सुरू केली आहे. मित्रपक्षांना सोबत न घेता भाजप मोर्चेबांधणी करत असल्याने, पवार कुटुंबियांनी चाणाक्षपणे युतीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘पवार ब्रँड’ राजकारणात टिकवण्यासाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव दोन्ही पक्षश्रेष्ठींना असल्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
