मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची आणि भाजपच्या नेत्यांची आज जागावाटपाबाबत पहिली बैठक पार पडली. या बैठकीत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची ताकद आहे. तसेच ठाकरेंचा पक्ष मनसेसोबतही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजप समोर मोठं आव्हान आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज आहे. त्यामुळे अतिशय खेळीमेळीने आणि समजूतदारपणे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आजची बैठक पार पडल्याची माहिती आहे. तर जागावाटपावरुन खटके उडणार नाही याची देखील काळजी घेतली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची देखील या निवडणुकीत बार्गेनिंग पावर बघायला मिळत आहे. आजच्या बैठकीत काय घडलं, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमवीर महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार आहेत. पण महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास भाजपने विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे मुंबई महापालिका निवडणुकीचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्यासोबत युती करु शकत नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेची महायुती मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार आहे.
विशेष म्हणजे मतदान अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलं असल्याने शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची आज जागावाटपावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीत भाजपने शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. पण शिवसेनेची 125 जागांची मागणी आहे. याबाबत पुढच्या बैठकीत चर्चा होणार आहे. पण आजच्या जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत 142 जागांता तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?
शिवसेना आणि भाजपच्या पार पडलेल्या आजच्या बैठकीत शिवसेनेला 52 तर भाजपला 90 जागा देण्याचं ठरलं आहे. पण अद्यापही 85 जागांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे या 85 जागांचा तिढा सोडवण्यासाठी आता गुरुवारी पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच अंतिम जागावाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेणार आहेत. ‘टीव्ही 9 मराठी’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
पुढच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असलेल्या जागा आणि काँग्रेसकडे असलेल्या जागांवर चर्चा होणार आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक असलेल्या काही जागांवर भाजपने दावा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्लिम बहुल असलेल्या जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी आहे. ठाकरेंच्या ताब्यातील बहुतांश जागा या शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती आहे. पण तरिही अंतिम जागावाटप ठरल्यानंतर सविस्तर माहिती समोर येईल.
