राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये मतदारांना एक वगळता 3 ते 5 नगरसेवकांना निवडून आणायचं असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
“या महापालिकांसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र द्यावं लागेल. सर्वपक्षीयांनी केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. जात वैधता पडताळणी संदर्भात राखीव जागांठिकाणी ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जमा करणं आवश्यक आहे. सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचं हमीपत्र उमेदवाराला द्यावं लागेल”, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
“या निवडणुकीत एकूण मतदार 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 असणार आहेत. त्यापैकी पुरुष मतदार हे 1 कोटी 81 लाख 93 हजार 666 असतील तर स्त्री मतदार 1 कोटी 66 लाख 79 हजार 455 असतील, इतर मतदार 4590 असतील”, अशी महत्त्वाची माहिती दिनेश वाघमारे यांनी दिली. “या निवडणुकीत 39,047 इतके मतदार केंद्र असतील. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक मशीनने घेतली जाईल”, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.
Municipal Election Announce : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले, 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल, वाचा A टू Z कार्यक्रम
“मुंबई महापालिकेसाठी 11,349 कंट्रोल युनीट असतील तर बॅलेट युनीट 22,698 असतील. या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहोत ती 1 जुलै 2025 पर्यंत अधिसूचित केलेली मतदार यादी वापरणार आहोत. ही यादी प्रभागनिहाय विभाजित करण्यात आलेली आहे. ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतली असल्याने त्यामध्ये कोणतं नाव टाकणं किंवा कमी करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीत. मात्र चुकून एक मतदाराचे नाव दुसऱ्या प्रभागात गेलं असेल तर ते बदलण्याचे अधिकार आहेत. विधानसभेच्या मतदारयादीत नाव आहे, पण प्रभागनिहाय मतदार यादीत नसेल तर ते समाविष्ट करण्याचे अधिकार असतील”, अशी माहिती त्यांनी दिली.
Municipal Election : आयुक्तांच्या घरात 150 आणि टॉयलेटमध्ये 10 मतदार कसे? राज्य निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
“या निवडणुकीत संभाव्य दुबार मतदारांची यादी केलेली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जावून सर्वेक्षण केलेलं आहे. तो कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करेल हे लिहून घेतलं आहे. काही दुबार मतदारांनी रिस्पॉन्स दिलेलं नाही. त्यांच्याकडून हमीपत्र घेतलं जाईल आणि ओळख पटवली जाईल तेव्हाच मतदान केलं जाईल”, असंदेखील आयुक्तांनी यावेळी सांगितलं. तसेच मुंबई महापालिकेत 11 लाखांच्या आसपास संभाव्य दुबार मतदार होते. त्याबाबत योग्य कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली.
