बालपणात आई-वडिलाचं छत्र हरवलेल्या दोन भावंडांनी यशाला गवसणी घातली. मोठा भाऊ इंडियन नेव्हीत तर छोट्या भावाची इंडियन एअर फोर्समध्ये निवड झाली आहे. या दोन्ही भावंडांचा मामाने सांभाळ केला.
नागनाथ मंगनाळे हा कंधार तालुक्यातील फुलवळ येथील रहिवासी आहे. त्याचे आई-वडील शेतकरी होते. वयाच्या सहाव्या वर्षी वडील संजय मंगनाळे आणि १४ व्या वर्षी आई शिवकांता मंगनाळे यांचं निधन झालं. बालपणात आई-वडिलाचं छत्र हरपल्यानंतर नागनाथ आणि साईनाथ यांना कोण सांभाळणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांचे मामा तुकाराम नामदेव यांनी दोघांना आपल्या गावी मुदखेड येथे नेले आणि त्यांचा सांभाळ करत शिक्षण पूर्ण केले. या कष्टाचं चीज या दोन्ही भावंडानी केलं आहे.
२०२२ साली साईनाथ मंगनाळे हा वयाच्या 19 व्या वर्षात इंडियन नेव्हीमध्ये भरती झाला. आपणही देशाची सेवा करायचं ठरवत नागनाथ याने देखील भारतीय हवाई दलाची तयारी सुरु केली. काही महिन्यांपूर्वी इंडियन नेव्हीमध्ये जागा निघाल्यानंतर त्याने ऑनलाईन फॉर्म भरला. त्याने ऑनलाईन अभ्यास वर भर दिला आणि ९ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निवड यादीत त्याने स्थान मिळवले. त्याची इंडियन एअर फोर्समध्ये एसएसआर पदासाठी निवड झाली आहे. नागनाथ आणि साईनाथ या भावंडाच्या यशाचे सर्वत्र कौतुक होतं असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“वडिलांच्या आणि आईच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि त्यांचं आमच्यामुळे नावलौकिक व्हावे यासाठी काहीतरी करून दाखवायचे, अशी जिद्दच आपण उराशी बाळगली होती. यात आम्हाला आमच्या मामाची मिळालेली साथ ही सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे. परिस्थितिची जाणीव ठेवून यावर मात करण्यासाठी त्यांनी नेहमीच आम्हाला प्रोत्साहित केले. तसेच माझ्या मोठ्या भावाने पण प्रत्येकवेळी मोलाचे सहकार्य केले आणि माझ्या सर्व गुरुजनांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करत माझ्यात नेहमीच नवचेतना निर्माण करण्याचे काम केले म्हणूनच मी इथपर्यंत पोहचू शकलो”, अशी भावना नागनाथ मंगनाळे याने व्यक्त केली.
“मनात जिद्द असेल आणि कष्ठ, मेहनत करण्याची वृत्ती असेल तर यश नक्कीच आपल्या जवळ आहे. एवढेच यातून मी शिकलो. अनेकांनी ही नोकरी खूप अवघड असते, असे सांगितले असतानाही माझ्या मामाने आणि भावाने मला मोठ्या आनंदाने प्रोत्साहन देऊन भारतीय हवाई दलात दाखल होण्यासाठी प्रेरणा दिली. ही माझ्यासाठी खूप मोलाची शिदोरी असून ती मी नेटाने सांभाळत देशाची सेवा प्रामाणिकपणे करणार”, असा निर्धार नागनाथ मंगनाळे बोलून दाखवला आहे.
