Congress News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवड येथे मोठे विधान केलं अशून मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे चव्हाण यांनी म्हटलं आहे. सध्याच्या पंतप्रधानांना बाजूला व्हावे लागेल, असंही त्यांनी सूचित केलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की, 19 डिसेंबर रोजी नेमके काय होईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे. सध्या अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. काही लोकांनी काही विशिष्ट कृती केल्या आहेत आणि काही लोकांची नावे पंतप्रधानपदाच्या चर्चेत आहेत. त्यामुळे काहीतरी सकारात्मक घडेल अशी आशा आहे. जर असे घडले तर मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल, असं चव्हाण म्हणाले.
पुढे बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, जर मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल, तर सध्याच्या पंतप्रधानांना बाजूला व्हावे लागेल. बदल होण्याची शक्यता दिसत आहे, पण हा बदल झाला तरी काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही, कारण काँग्रेसकडे सध्या बहुमत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पृथ्वीरज चव्हाण यांनी यावेळी अमेरिकेतील एका कायद्याचा उल्लेख केला. 19 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत एका कायद्यानुसार काही महत्त्वाची माहिती सार्वजनिक होणार आहे. एफस्टीन नावाच्या व्यक्तीशी संबंधित एका प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात काही मोठ्या नेत्यांची नावे असण्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर काही नावे व्हायरल होत आहेत. सुमारे 75 हजार फोटो आणि 20 हजार ई-मेल्स समोर येण्याची शक्यता आहे. अमेरिकन संसदेने स्पष्ट केलं आहे की, ही माहिती शोधता आणि डाउनलोड करता येईल. कोणताही मोठा नेता असला तरी त्याला संरक्षण दिलं जाणार नाही, असंही चव्हाण यांनी सांगितलं.
