Nashik-Mumbai Local: केंद्रीय रेल्वे प्रशासनाने मनमाड-कसारा आणि कसारा-मुंबई मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वेमार्गिका उभारण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे नाशिक ते मुंबईदरम्यान लोकलसेवा सुरू होण्यासह नवीन गाड्यांसाठी स्लॉटची समस्या सुटणार आहे.
नाशिक-मुंबई लोकल सेवा सुरू व्हावी, ही नाशिककरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. नवीन एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर गाड्या वाढवाव्यात याकरिताही अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे. परंतु ‘स्लॉट उपलब्ध नाहीत’, असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात होते. अपुऱ्या रेल्वेमार्गिका क्षमता हे या सर्व प्रश्नांचे मूळ असल्याचे लक्षात आल्यानंतर खासदार वाजे यांनी हा प्रश्न तडीस नेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
मुंबईत रेल्वेला मिळणार स्वयंचलित दरवाजे! नॉन- एसी गाड्या विकसित करण्याचा केंद्राचा आदेश; काय असतील वैशिष्ट्ये?
मुंबई विभागाकडे येणाऱ्या विद्यमान मार्गावर प्रचंड गर्दी असते. वेगवेगळ्या गाड्यांचे तासन्तास कोंडीत अडकणे, अप-डाउनची मर्यादित क्षमता, मालगाड्यांची वाढती संख्या आणि सिग्नलिंगवरील दडपणामुळे नवीन सेवांची अंमलबजावणी अशक्य होत होती. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर खासदार वाजे यांनी केंद्र व रेल्वे मंत्रालयाकडे मनमाड-कसारा आणि कसारा-मुंबई या दोन महत्त्वाच्या कॉरिडॉरवर स्वतंत्र दोन-दोन नवीन रेल्वेमार्गिका उभारण्याची मागणी केली. याकरिता पाठपुरावाही सुरू ठेवला. या पाठपुराव्याला यश आले असून, रेल्वे मंत्रालयाने दोन्ही मार्गांवर नवीन दुहेरी रेल्वेमार्गिका उभारण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई लोकल प्रकल्पाला गती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिलेला हा सामान्य जनजीवनाशी थेट संबंधित प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्यास बळ मिळणार आहे.
Supriya Sule | इंडिगो विमानसेवा विस्कळीत, भारत सरकारने ॲक्शन घ्यावी; सुप्रिया सुळे भडकल्या
कसा होईल फायदा?
या दोन नवीन मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवता येणार आहे. त्याचबरोबर, लोकल ट्रेनचा मार्ग मोकळा होऊन त्यावरील भार कमी होणार आहे. त्यामुळे कसारा मार्गावर धावणाऱ्या लोकलचे वेळापत्रक सुधारण्याची शक्यता आहे. मालवाहतूकीमुळे लोकल ट्रेनच्या मार्गांवर विलंब व्हायचा. या दोन मार्गिकेंवर माल वाहतूक वळवली की रेल्वेवरील तो ताणही कमी होणार आहे. त्याचबरोबर, मुंबई-नाशिक-मनमाड रेल्वे प्रवासाला गती मिळणार आहे.
