• Mon. Jul 27th, 2026
    Pune Traffic: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३ मोठे प्रकल्प, फडणवीसांनी कोणते आदेश दिले?

    पुणे: पुणे शहरात मागील काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्चक्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), पुणे अंतर्गत रिंगरोड आणि बोगद्यांचे जाळे हे तीन प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांच्या नियोजन, वित्तीय व्यवस्थापन, अंमलबजावणी, देखरेखीसाठी गठित उच्चस्तरीय समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी व अति पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पांची माहिती दिली.

    मुख्यमंत्री काय म्हणाले?

    पुणे वाहतूक कोंडीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “उच्चक्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर) हा पुण्याच्या भविष्यातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचा एक परिवर्तनकारी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. एचसीएमटीआर व बोगदा प्रकल्प हे पुणे शहराला अधिक कार्यक्षम, वाहतूक सुलभ व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. या तीनही प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका व पुणे महानगर विकास प्राधिकरण यांना देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात यावं,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

    “पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ४३.६० किमी अंतराच्या या प्रकल्पामुळे २५ ते ३० टक्के वाहतूक कमी होणार आहे. यामुळे सर्व मेट्रोमार्गिका जोडल्या जाणार असून रस्त्याची वाहतूक क्षमता वाढणार आहे. त्यामुळे एचसीएमटीआर या प्रकल्पाचे काम लवकर सुरू करुन २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. यासाठीचे आर्थिक मॉडेल तयार करून प्रस्ताव पाठवावेत,” असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

    पीएमआरडीएद्वारे राबविण्यात येणारा अंतर्गत रिंग रोड हा प्रकल्प ८३.१२ किमीचा असून यामध्ये ४४ गावांचा समावेश आहे. या अंतर्गत रिंग रोडचे काम पाच टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाची प्रक्रिया येत्या सहा ते सात महिन्यांत पूर्ण करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. रोख मोबदला देऊन रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

    पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पाताळलोक प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरात तीन ठिकाणी बोगदे तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये भोसरी ते उंड्री – नवीन विमानतळ (३६ किमी यामध्ये १० किमी एलिव्हेटेड), रामनदी- भूगाव ते राजाराम पूल (८ किमी) आणि तळजाई टेकडी ते पद्मावती-हिंगणे (१.६५ किमी) या बोगद्यांचे प्रस्तावित आहे. या बोगद्यांच्या जाळ्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची अथवा तज्ज्ञांची मदत घेऊन सर्वंकष सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed