Virar Fire: विरारमध्ये एका इमारतीच्या सदनिकेत भीषण आग लागली. या दुर्घटनेत कर्जबाजारी अखिलेश विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला असून, त्यांना वाचवताना सुषमा विश्वकर्मा व लक्ष्मीकांत विश्वकर्मा हे दोघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण दीप प्लाझा ही इमारत विरार पूर्वेकडील मामानगर परिसरात आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावरील एका सदनिकेला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. सदनिकेला आग लागल्यामुळे इमारतीतील रहिवासी आणि परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. आग लागल्याच्या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व सदनिकेला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलं.
इमारतीतील सदनिकेला अचानक मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यामुळे सदनिकेतील तीन जण याआगीत होरपळले आहेत. आगीत होरपळलेल्या तिघांपैकी अखिलेश विश्वकर्मा या व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. सुषमा विश्वकर्मा आणि लक्ष्मीकांत विश्वकर्मा अशी दोन जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी एकाला पुढील उपचारासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
तपासात धक्कादायक माहिती आली समोर
कर्जबाजारी झाल्याने मृत अखिलेश विश्वकर्मा यांनी स्वतःला पेटवून घेतले व त्याला वाचवण्यासाठी गेलेले दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेची नोंद विरार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
