कळंबोली येथे एका टपरी चालकाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी टपरी चालकाची हत्या का केली? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
संबंधित हत्येची घटना ही 1 डिसेंबरला पहाटे 1.45 वाजेच्या सुमारास घडली. 37 वर्षीय टपरी चालक रत्नेश कुमार राजकुमार जैस्वाल आपलं काम आटोपून घरी जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्याचा रस्ता अडवला. पाहता पाहता आरोपींनी हाताबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली. हल्लायनंतर दोन्ही आरोपी काही सेकंदांतच स्कूटीवरून पळून गेले. तर गंभीर जखमी झालेले जैस्वाल यांचा मृत्यू झाला. कळंबोली पोलिसांनी तत्काळ दोन अज्ञात आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेने कळंबोली पोलिसांसह समांतर तपास सुरू केला. सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी स्कूटीवरून येताना आणि घटनास्थळ सोडताना स्पष्ट दिसले. तांत्रिक तपास आणि प्रत्यक्षदर्शी माहितीच्या आधारे पथकाने आरोपींचा ठावठिकाणा शोधत मोहम्मद चाँद आणि जुएफ जमिल या दोघांना ताब्यात घेतले.
नृत्यांगना दीपाली पाटील मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, संदीप गायकवाड याच्याबद्दल कोर्टाचा महत्त्वाचा निर्देश
चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तृतीयपंथीय व्यक्तीसोबत झालेल्या किरकोळ भांडणात हस्तक्षेप करणाऱ्या जैस्वालवर त्यांनी रागाच्या भरात हल्ला केल्याचे तपासात उघड झाले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला लाकडी दांडकाही जप्त करण्यात आला असल्याची माहिती कळंबोली पोलिसांनी आज दिली आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा, कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक पवन नांद्रे, अभयसिंग शिंदे, माधव इंगळे, एएसआय अनिल पाटील आणि पथकाने केली. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या हत्याकांडाचा जलद उलगडा केल्याबद्दल गुन्हे शाखेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
