Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत ही घोषणा केली. 2009 पासून सुरू असलेले हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
2009 मध्ये सुरू झालेल्या या महामार्गाचा 89 टक्के भाग पूर्ण झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. उर्वरित काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अर्विंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती त्यांनी दिली. मुंबई-गोवा महामार्ग कोकणातून जात असून, रस्ते, महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचा समावेश करून बांधण्यात आला आहे. पनवेल, रत्नागिरी, गोवा यांसह अनेक ग्रामीण भागांनाही हा महामार्ग जोडणार आहे. हा चार पदरी महामार्ग असून पूर्वी 2025ची डेडलाईन देण्यात आली होती, मात्र विविध कारणांमुळे कामात विलंब झाला. आता मात्र प्रकल्प अंतिम टप्प्यात असून 2026 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
मोठी अपडेट! पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल, रेल्वेमंत्र्यांची लोकसभेत माहिती
कसा असेल मार्ग?
सध्या मुंबई ते गोवा हा प्रवास 12 तासांचा असतो. महामार्ग सुरू झाल्यानंतर हा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊन केवळ 6 तासांत प्रवास करता येणार आहे. 466 किमी लांबीच्या या महामार्गासाठी तब्बल 7300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
अनेकदा विलंब झालेल्या या रुंदीकरण प्रकल्पामुळे आता चार पदरी एक्सप्रेसवे उपलब्ध होणार असून, वाहने अधिक वेगाने आणि सुरक्षिततेने धावू शकतील. माणगाव, इंदापूर, पाली, लांजा, कोलाड, चिपळूण या ठिकाणी बायपास, अंडरपास आणि उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. त्यामुळे या शहरांना थेट जोडणी मिळून वाहतुकीत मोठा दिलासा मिळणार आहे.
निवडणुकीत पैसेवाटप, निवडणूक आयोग ते विरोधी पक्षनेते पद; भास्कर जाधव प्रचंड संतप्त
दोन महत्त्वाच्या मार्गाबद्दल अपडेट
या महामार्गाबरोबरच पुणे–कोल्हापूर मार्ग आणि धुळे–पिंपळगाव मार्गाबाबतही चर्चा झाली. धुळे–पिंपळगाव चौपदरी रस्त्याला सहा पदरी करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे, तसेच पुणे–कोल्हापूर मार्ग वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
