• Mon. Mar 16th, 2026
    राज्यातील 75 गावे होणार स्मार्ट! सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण देणार

    Maharashtra Smart Village Project: नवतंतत्रज्ञान आणि डिजिटल सुविधांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागांतील दरी कमी करून ग्रामीण जीवनमान उंचावणे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज प्रकल्प सुरू करण्यात आला.

    smart villageAI(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यातील गावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून स्मार्ट आणि इंटेलिजंट व्हिलेज प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी बारामतीसह काटोल, चांदुरबाजार, कळमनुरी आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील ७५ गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतीमध्ये सीसीटीव्ही, वाय-फाय, हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षणासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात येणार आहेत.

    नागपुरातील मौजे सातनवरी या गावी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला होता. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील १० गावे या प्रकल्पांतर्गत समाविष्ट करून स्मार्ट व इंटेलिजंट व्हिलेज उभारण्याची घोषणा केली. त्यानुसार, राज्यात सर्व जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये हा प्रकल्पात अंमलात येणार आहे.
    Maharashtra TimesMumbai Crime : कुर्ल्यामध्ये पहाटे बस स्थानकावर थांबलेल्या विद्यार्थ्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे न्यायालयाकडून तीन वर्षांची शिक्षा
    या प्रकल्पातून संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सीसीटीव्ही देखरेख, वाय-फाय, हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण इत्यादी विभागांच्या ऑनलाइन सेवा व ई-प्रकल्प, स्मार्ट कृषि सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अशा स्मार्ट सेवा टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तर, प्रकल्पातील अडचणींच्या सोडवणुकीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून निधी दिला जाणार असून सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
    Maharashtra Timesकाँग्रेसच्या ‘त्या’ पराभवामागे CIA, मोसादचा हात; माजी खासदार कुमार केतकरांचा सनसनाटी दावा
    पहिल्या टप्प्यातील गावे
    पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील एकूण ७५ गावांमध्ये या प्रकल्पाचा प्रायोगिक तत्त्वावर विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. त्यानुसार बारामती (१०), काटोल (१०), चांदुरबाजार (२३), कळमनुरी (११) आणि वैभववाडी (२१) या तालुक्यांत हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा