काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी सनसनाटी दावा केला आहे की, अमेरिकेची सीआयए आणि इस्रायलची मोसाद या गुप्तचर यंत्रणांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी कट रचला होता. काँग्रेस सत्तेत राहिल्यास भारतात हस्तक्षेप करता येणार नाही, अशी भीती या यंत्रणांना होती, असे ते म्हणाले.
वृत्तसंस्था पीटीआयनं कुमार केतकर यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल सनसनाटी दावे केले आहेत. हा व्हिडीओ २६ नोव्हेंबर २०२५ रोजीचा असल्याची माहिती समोर आली आहे. संविधान दिनानिमित्त काँग्रेस पक्षानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुमार केतकर बोलत होते. ते काँग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार आहेत.
राहुल गांधींच्या आरोपांमुळे वादात; आता केंद्रीय निवडणूक आयुक्तांवर विशेष जबाबदारी, मानाचं स्थान
‘काँग्रेसनं २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत १४५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाच्या जागा वाढून २०६ वर गेल्या. हाच ट्रेंड कायम राहिल्यास २०१४ मध्ये काँग्रेसला २५० जागा मिळू शकत होत्या. पक्ष अगदी आरामात सत्तेत राहिला असता. पण २०१४ मध्ये काँग्रेसच्या जागा थेट ४४ वर आल्या,’ अशी आकडेवारी कुमार केतकर यांनी मांडली.
काँग्रेसच्या पराभवामागे अमेरिकेची सीआयए आणि इस्रायलची मोसाद अशा दोन गुप्तचर यंत्रणा होत्या, असा दावा केतकर यांनी केला. काँग्रेस सत्तेत कायम राहिल्यास आपल्याला भारतात हस्तक्षेप करता येणार नाही, असं दोन्ही यंत्रणांना वाटत होतं. त्यांना आपल्या हिशोबानं धोरणं लागू करायची होती. काँग्रेस सरकार त्यात अडथळा ठरणार होतं. त्यामुळे २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत या दोन्ही देशांनी हस्तक्षेप केला, असा दावा केतकर यांनी केला.
गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग; मोदी, शहांच्या होमग्राऊंडवर ‘नव्या’ चेहऱ्याची एन्ट्री?
‘मोसादनं भारतीय राज्यं आणि मतदारसंघांचा सविस्तर आणि सखोल डेटा गोळा केला. निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करण्यासाठी सीआयए आणि मोसादनं मतदारांची सखोल माहिती तयार ठेवली होती. त्यावेळी पंतप्रधानपदी असलेल्या मनमोहन सिंग यांच्याबद्दल काही प्रमाणात नाराजी होती. पण ती नाराजी इतकी नव्हती की त्यामुळे काँग्रेस २०६ वरुन ४४ वर येईल. २०१४ मध्ये आलेला निकाल हा जनादेश नव्हता,’ असा दावा केतकर यांनी ठामपणे केला.
