• Wed. Jun 17th, 2026
    Amravati Crime: 28 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या, मध्यरात्री नेमकं काय घडलं? अमरावतीत खळबळ

    Amravati Murder Case: अमरावतीतील बडनेरा परिसरात 28 वर्षीय ऋषिकेश कापेकरची निर्घृण हत्या झाली. या घटनेमुळे परिसरात तणाव असून नागरिकांनी पोलिसांवर निष्क्रीयतेचे आरोप करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. भाजप नेत्यांनी बाहेरून आलेल्या तरुणांवर संशय व्यक्त केला असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

    28 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या, मध्यरात्री नेमकं काय घडलं?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमरावती: बडनेरा परिसरात एका 28 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली असून ऋषिकेश कापेकर असं या तरुणाचं नाव आहे. बुधवारी मध्यरात्री जुन्या वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला असून, नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत पोलिसांवर निष्क्रीयतेचे आरोप केले आहेत. भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी या हल्ल्यामागे बाहेरून आलेल्या तरुणांचा हात असल्याचा आरोप केला आहे, तर पोलिसांनी या आरोपांची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून, कोणत्याही समुदायाबद्दल चुकीची माहिती न पसरवण्याची विनंती केली आहे.

    याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील जुन्या वस्तीत बुधवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. ऋषिकेश कापेकर नावाच्या 28 वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत त्यांनी पोलिसांवर निष्क्रीयतेचे आरोप करण्यात आले आहेत. हत्येतील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

    या घटनेनंतर भाजपचे नेते शिवराय कुलकर्णी यांनी एक गंभीर आरोप केला. त्यांच्या मते, हा हल्ला बाहेरून आलेल्या काही संशयित तरुणांनी सामूहिकरीत्या केला आहे. परंतु, पोलिसांनी या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, कोणत्याही समुदायाबद्दल चुकीची माहिती पसरवू नये. शिवराय कुलकर्णी यांनी पोलिसांवर टीका केली. त्यांनी म्हटले की, पोलिसांनी “थातूरमातूर कारवाई न करता” आरोपींवर गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करावेत. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. जर पोलिसांनी अकार्यक्षम भूमिका घेतली, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

    दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे बडनेरा परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस सर्व शक्य मार्गांनी तपास करत असून मृत ऋषिकेश कापेकर यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना तातडीने अटक करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा