Jalgaon accident 4 died: जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर ते पहूर मार्गावर काल रात्री एक भीषण अपघात झाला आहे. यात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीला मालवाहू पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात चारही तरुण जागीच ठार झाले आहेत.
हा अपघात काल रात्री साडेदहाच्या सुमारास झाला. अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश सुरेश लोखंडे, अजय फ्कीरा साबळे आणि रवी सुनील लोढे हे चार तरुण जामनेरच्या दिशेने बाईकवरून येत होते. त्याचवेळी सिल्लोड येथील एक व्यापारी पिकअप व्हॅनने आपल्या गावाकडे निघाला होता. पिंपळगाव गोलाईत गावाजवळच्या वळणावर मालवाहू वाहनाने या तरुणांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील चारही युवकांचा जागीच मृत्यू झाला. पिकअप व्हॅनचा चालक जुबैर कुरेशी यालाही दुखापत झाली.
अपघाताची बातमी कळताच पोलीस आणि परिसरातील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेले. हे चारही तरुण जामनेरचे रहिवासी होते. ते काही कामासाठी पहूरला गेले होते. अपघाताची माहिती मिळाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. सर्व तरुण अंदाजे २० ते २२ वयोगटातील होते. या चार तरुणांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
जळगाव जिल्ह्यात सध्या रस्त्यांची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवताना अनेकदा अपघात घडतात. दुचाकीस्वार खड्ड्यातून वाचण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचवेळी मागून येणारी गाडी त्यांना धडक देते. अशाच एका दुर्घटनेत जामनेर तालुक्यातील पहूर जवळ चार तरुणांचा बळी गेला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात ही एक गंभीर समस्या बनली आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
