Pune Crime: पुण्यात फुरसुंगी-आदर्श नगर परिसरात कोयता गँगने वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपींना पकडले आणि सार्वजनिक ठिकाणीच त्यांची धिंड काढून कठोर शिक्षा दिली. या कारवाईने गुंडगिरीला आळा घालण्याचा पोलिसांचा उद्देश स्पष्ट झाला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हातात धारदार कोयते घेऊन घोषणा देत गाड्या, रिक्षा आणि इतर वाहनांची बेछूट तोडफोड करताना स्पष्ट दिसत होते. हीच दहशत नागरिकांसमोर निर्माण झाली असताना, पोलिसांनी पकडलेल्या आरोपींना नेमकं त्याच ठिकाणी आणून कठोर शिक्षा दिली. टायरमध्ये घालून, गुडघ्यावर चालायला लावून आणि बेल्टने चोप देत पोलिसांनी या गुंडांची धिंड काढली. ‘आवाज येतोय का…?’ अशा शब्दांत पोलिसांना दिलेला कडक संदेश परिसरात घुमला.
फुरसुंगी-आदर्श नगर भागात मागील काही दिवसांपासून वाढणाऱ्या गुंडगिरीला थोपवण्यासाठी ही कारवाई निर्णायक ठरली. सार्वजनिक ठिकाणीच केलेल्या शिक्षा कारवाईचा उद्देश गुंडांना मानसिक रोख लावण्याचा होता, असा पोलिसांचा स्पष्ट संदेश आहे. पुण्यात कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी किंवा दहशत सहन केली जाणार नाही, हे दाखवून देण्यासाठीच आरोपींना नागरिकांसमोर फिरवण्यात आलं. सिनिअर पीआय अमोल मोरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या घटनेनंतर दहशतीत असलेल्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला असून पोलिसांच्या तत्परतेचं जोरदार कौतुक होत आहे. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या तोडफोडीनं घाबरलेल्या नागरिकांना पोलिसांच्या या धडक कारवाईनं मोठा दिलासा दिला आहे. पुण्यात गुंडगिरीला पायबंद घालण्यासाठी अशा कारवाया गरजेच्या असल्याचं नागरिकांचं मत आहे.
