Angar Election: अनगर नगरपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीला न्यायालयीन आव्हान देण्यात आलं असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी आज सुनावणी झाली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज सूचकाची सही नसल्याच्या कारणावरून बाद करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बिनविरोध घोषित करण्यात आली होती. मात्र ही बिनविरोध निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप करत, “माझा अर्ज मुद्दाम बाद करण्यात आला,” असा गंभीर आरोप थिटेंनी केला होता. यामागे प्रशासन आणि भाजप नेते व माजी आमदार राजन पाटील हे असल्याचा आरोप थिटे यांच्याकडून करण्यात आला होता.
“सध्या सुरू असलेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक अधिकारी, नव्याने घोषित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष तथा आक्षेप घेणाऱ्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांना उद्या शपथपत्रासह आपले प्रतिपादन सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, 3 डिसेंबरला निकाल लागेपर्यंत नगरपंचायत बिनविरोध घोषित करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाकडून देण्यात आला आहे,” अशी माहिती उज्ज्वला थिटेंचे वकील ऍड.दत्ता घोडके यांनी दिली.
दरम्यान, “न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे; मला नक्की न्याय मिळेल,” अशी भावनिक प्रतिक्रिया उज्वला थिटे यांनी दिली. अनगरच्या राजकारणात चाललेल्या नाट्यमय घडामोडींमुळे आगामी दिवसांत काय निर्णय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
