राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीतील प्रचारसभेत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. आपल्यावर गेल्या वर्षभरात असंख्य वार झाल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
“आम्ही परळीच्या विकासासाठी आजपर्यंत आम्ही कधीच कमी पडलो नाही. परळीच्या विकासाबाबत आमचं एक व्हिजन आहे. आता समोरच्यांचं व्हिजन काय असेल? समोरच्याचं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं व्हिजन काय असेल? अचानक निवडणूक लागायच्या आधीच माणूस बिचकला. तसेच तुतारी घेऊनच आला. मला त्याबद्दल बोलायचं नाही. पण असे वार माझ्या जीवनात अनेकांनी केले”, अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
‘आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही…’, धनंजय मुंडे यांना भर प्रचारसभेत वाल्मिक कराडची आठवण?
“एक वर्षापासून मी सहन केलं. मी काय सहन केलंय ते मला फक्त एकट्याला माहिती आहे. जीवनात गेल्या वर्षभरात एवढे वार माझ्या छातीवर झाले. एवढे वार होऊनही मी थोडाही डगमगलो नाही. कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठिमागे होती. ज्यांनी माझी मदत घेऊन आज दगाफटका केला असेल त्यांना फक्त एवढंच सांगणं आहे, केलेली मदत विसरले आहेत. त्यांना अवकातीत आणावं लागेल. अनेक जण आपली हद्द विसरले आहेत. परळीत यायचं, उटसूठ कसेही आरोप करायचे. या गोष्टीच्या मला वेदना नाही झाल्या? हो मला माहिती आहे. परळीत काय, परळी हे असं, ते असं”, असं धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे आणखी काय-काय म्हणाले?
“अरे काय, किती सहन करायचं? ते सहनही केलं. गप्प राहिलो. कारण शेवटी संयम महत्त्वाचा असतो. आपण सर्वांना तशा पद्धतीने ताकद उभी केली. ती ताकद उभ्या महाराष्ट्राला त्या काळात दिसली नाही. पण आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून, सर्वच्या सर्व उमेदवार ऐतिहासिकपणे निवडून आणून, या उभ्या महाराष्ट्राला दाखवायचं आहे. ज्या ज्या वेळेला आपल्याला खवळलंय, आपण कुणाला खवळत नाही. ज्यांनी ज्यांनी खवळलंय, त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मग आपल्यालतले मतभेद असतील, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधील, माझ्या सहकाऱ्यामध्ये मतभेद असतील”. “मला माहिती आहेत की ते कसे मतभेद आहेत. आजपासून त्यांच्या घरी जाण्याचं आणि मनधरणी करण्याचं काम करणार आहे. जाऊदे बाबा चल. सगळ्या गोष्टी होणार आहे. माझ्या जे काम ते चोख करणार आहे. माझ्यापेक्षा जास्त चोख काम महायुतीचे सहकारी करणार आहेत. मतदारांच्या दारापुढे जावून डोकं ठेवायचं. विजय ऐतिहासिक करायची जबाबदारी पंकजा ताई आणि माझी आहे हे वचन द्यायचं आहे.”
