Raigad Crime: गर्भवती भावजयीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करून फरार झालेला आरोपी संतोष गणपत राणे याला अखेर नेरळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये नाव बदलून केटरिंग व्यवसाय करणाऱ्या आरोपीला तांत्रिक चौकशी व गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारी 2001 रोजी पोही गावात संतोष राणेने आपल्या भाऊ अनिल राणे आणि पत्नी गुलाब राणे यांच्यातील किरकोळ वादातून रागाच्या भरात घरातून कुऱ्हाड आणली. त्याने गर्भवती भावजयीवर वार केले. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी गावातून पळून गेला आणि तब्बल 24 वर्षे फरार राहिला.
रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी आरोपीचा शोध घेतला. नातेवाईकांकडून, जुन्या धागेदोऱ्यांद्वारे आणि तांत्रिक तपासाद्वारे आरोपी सांगवी, पिंपरी-चिंचवड येथे राहत असल्याची माहिती मिळाली. आरोपी स्वतःचे नाव ‘संतोष गणपत पाटील’ असं सांगून केटरिंग व्यवसायात गुंतला होता.
पोलीस उपनिरीक्षक भास्कर गंगाधर गच्चे, पोशि. राजाभाऊ केकाण आणि पोशि. आश्रुबा बेद्रे या विशेष पथकाने संयम, शिताफी आणि नियोजनपूर्वक कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.फरार आरोपीला अटक करून नेरळ पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलीक करत आहेत.
आरोपीला पकडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा आणि समाधान व्यक्त केले जात आहे. दोन दशकांहून अधिक काळ फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञान, चौकशी आणि गुप्त माहितीचा वापर केला. 24 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडल्याने पीडितेच्या कुटुंबाकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
