Ahilyanagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. बीडमध्ये झालेल्या मस्साजोगसारखंच प्रकरण आता समोर आलं आहे. या प्रकारानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
उर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेला गालबोट
बीडच्या मस्साजोग प्रकल्पातील खंडणी व हत्याकांड विसरायचीही उसंत नसताना, पारनेर तालुक्यातील दरोडी येथील पवनचक्की प्रकल्पात राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या पदाधिकाऱ्याने माजवलेल्या दहशतीने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. जिल्हा उपाध्यक्ष विकास राघु पवार हा सरळ दरोडेखोरासारखा थाटात पवनचक्की प्रकल्पात घुसला, सिक्युरिटी गार्डला अमानुष मारहाण केली, कार्यालयात उधळण केली आणि दरमहा दोन लाखांची खंडणी उघडपणे मागितली.
Mhada Update: पुणेकरांनो म्हाडाकडून शेवटची संधी, 4186 घरांसाठी सोडत; अर्जाची मुदत वाढवली, शेवटची तारीख किती?
‘इथे कसं काम करतोस? कंपनी बंद का नाही केली?’
18 नोव्हेंबर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गार्ड राजेंद्र घुले ड्युटीवर असताना विकास पवारने थेट कार्यालयात घुसखोरी केली. फिर्यादीनुसार पवारने घुले यांना खुर्चीवरून खेचून खाली पाडले. पोटात आणि पाठीत लाथा बुक्क्याने मारहाण करत हातातील कोयता थेट गळ्याजवळ लावून जीव घेण्याच्या धमक्या दिल्या. ‘इथे कसं काम करतोस? कंपनी बंद का नाही केली?’, अशी धमकी दिली. यानंतर त्याच्यासोबतचे 7 ते 8 जण दांडके, दगडं घेऊन आत धडकले आणि खिडक्या, संगणक, सिस्टम फोडत अक्षरशः धुडगूसच घातला आणि गार्डचा मोबाईल हिसकावून फोडण्यात आला.
‘दर महिन्याला दोन लाख हवेत…’
मारहाणीदरम्यान विकास पवारनेच स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ‘पवनचक्की सुरू ठेवायची असेल तर दरमहा मला दोन लाख रुपये द्यावेच लागतील.’ याच धिंगाण्यात पवार टोळक्याने गार्डच्या खिशातील 22 हजारांची रोकडही हिसकावली. साईड इंन्चार्ज किरण पवार यांनी धावत येऊन गार्डची सुटका केली तेव्हा हल्लेखोर पसार झाले.
Accident News : आई, स्टेशनला आलीस की घ्यायला येतो; माऊलीने पहाटे लेकराला उठवायचं टाळलं, रिक्षाने घरी येताना विचित्र अपघातात मृत्यू
पवार टोळक्याची सातत्याने दमदाटी
ठेकेदार चंद्रभान ठुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबरलाही विकास पवार कार्यालयात घुसून गार्डला धमकावून गेला होता. ठुबे यांनं सांगितलं की, आम्ही 2016 पासून कायदेशीररीत्या सुरक्षा काम करतो. महाराष्ट्र पोलीस महासंचालक परवाना मान्य आणि कधीही वाद नाही. पण पवार टोळक्याच्या तोडफोडीमुळे कंपनीला दररोज 10 ते 12 लाखांचं नुकसान होत आहे.
Hingoli Crime : नवरा-बायकोमध्ये सतत वाद, ‘पत्नीला नांदायला का पाठवत नाहीत?’ विचारल्यावर सासरा अन् मेव्हण्याने जावयाला संपवलं
पारनेर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद
या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी विकास पवार व त्याच्या टोळक्यावर पारनेर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. प्रकरण उघड होताच तालुक्यात राजकीय खंडणीचे सावट किती खोलवर गेले आहे, हा भीषण प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. पुढील तपास पारनेर पोलीस ठाणे करीत आहे.
