ठाण्यात महायुतीत श्रेयवादावरुन वादाची ठिणगी पडली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देण्यावरुन दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयवाद पेटला आहे. या प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
बीएसयुपी घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघ्या १०० रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयामुळे ठाण्यातील रहिवाशांना दिलासा मिळाला. या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे आभार मानत श्रेय घेण्याची चढाओढ महायुतीतील शिवसेना-भाजपच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये लागली आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री पाचपाखाडी येथे टेकडी बंगला परिसरातील रायगड आळी भागात शिवांजली सोसायटीत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी राजेश मोरे यांच्या माध्यमातून जल्लोष केला जाणार होता. याठिकाणी शिवसेनेचे उपविभागप्रमुख महेश लहाने आणि शाखाप्रमुख हरेश महाडिक यांना भाजपचे माजी स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप राजेश मोरे यांनी केला. या घटनेनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची स्टंटबाजी
“पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची ही स्टंटबाजी असून अशी कोणतीही मारहाण केली नाही”, असा दावा नारायण पवार यांनी केला. “या घटनेत तथ्य असल्यास विरोधकांनी सीसीटीव्ही फुटेज अथवा चित्रफीत समोर आणावी”, असेही आव्हान पवार यांनी दिले. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. स्थानिक दहशतीला कंटाळले असल्याचे प्रत्त्युत्तर राजेश मोरे यांनी दिले. दरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला.
दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ
या निर्णयाच्या श्रेयवादातून दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी या निर्णयानंतर धर्मवीर नगर येथील बीएसयुपी इमारतींमधील रहिवाशांसोबत जल्लोष साजरा केला. तर युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांनी या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिला. यावेळी रहिवाशांनी या निर्णयाबद्दल शिंदे यांचे आभार मानले. तसेच ब्रह्मांड येथे राहणाऱ्या जोगिला तलाव विस्थापित रहिवाशांसोबत टेंभीनाक्याचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी स्थानिकांनी खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले.
