• Sun. Aug 9th, 2026

    Tukaram Mundhe: आता मोर्चा मद्य, चायनीज पदार्थांकडे! ‘एफडीए’च्या पुढील कारवाईबाबत तुकाराम मुंढे यांचे सूतोवाच

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: दूध, पनीर, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या गुणवत्ता तपासणीनंतर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आपला मोर्चा आता मद्याकडे वळवणार आहे. ‘गुणवत्तेबाबत तक्रारी येत असल्याने पुढील काळात मद्यावर कारवाईचे नियोजन आहे. त्याचबरोबर चायनीज पदार्थांचीही तपासणी केली जाणार आहे’, असे ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी नमूद केले.

    ‘माय जनसेवक’ आणि ‘पुणे लोकल’ यांच्या वतीने आयुक्त मुंढे यांची मुलाखत बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. लेखक अरविंद जगताप आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी मुंडे यांनी ‘एफडीए’च्या पुढील कारवाईबाबत माहिती दिली.

    तुकाराम मुंढेंचा कधी न पाहिलेला अंदाज; अरविंद जगतापांच्या प्रश्नांना भन्नाट उत्तरं

    ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वी गावठी दारूमुळे २० नागरिकांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासातून या प्रकरणात चुकीच्या रसायनांचा वापर झाल्याचे समोर आले. त्यामुळे हा गंभीर विषय असल्याने याकडे लक्ष देण्यासाठी गरज आहे. अल्कोहोलिक आणि बिनअल्कोहोलिक पेयांची गुणवत्ता तपासणी करावी लागणार आहे’, असे ते म्हणाले.

    ‘अन्न सुरक्षा हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे दूध, पनीर, तेल यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात आहे. पूर्वीचा विचार केला तर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना भेसळमुक्त अन्न पदार्थ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादक, प्रशासन आणि नागरिक या तिन्ही घटकांनी आपल्यावरील जबाबदारी योग्यरित्या पार पाडणे आवश्यक आहे. उत्पादकांनी दर्जेदार पदार्थ तयार करावेत, प्रशासनाने तपासणी करून देखरेख ठेवावी आणि नागरिकांनी काही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित प्रश्न विचारावेत. तिन्ही घटकांनी योग्य काम केल्यास भेसळ रोखणे शक्य आहे’, असे मुंढे यांनी यावेळी सांगितले.

    Sushma Andhare: जरांगेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेंना वाटतेय वेगळीच शंका; पडद्याआड कोणत्या घडामोडी सुरू असल्याचा दावा?‘… तर संबंधितांवर कारवाई’

    ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप होत आहे. याबाबत सरकारकडून चौकशी सुरू आहे. तपास सुरू असल्याने नेमके काय झाले, हे सध्या सांगता येणार नाही. मात्र, पेपर फुटला असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल’, असे मुंढे यांनी नमूद केले.

    सध्या राज्यात अन्न पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण आहे. मात्र, आगामी काळात मद्यावर कारवाई करण्याचे नियोजन आहे.- तुकाराम मुंढे, आयुक्त, एफडीए

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed