शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं देखील त्यांनी मान्य केलं. यावेळी काय-काय चर्चा झाली, या विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
“नाराजी दूर किंवा नाराजी जवळ असा काही प्रश्नच येत नाही. शेवटी महायुतीचं सरकार आहे. एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात. पण हे शेवटी तीन पक्षांचं सरकार आहे. महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे थोड्याशा मनातील काही भावना या एक-दुसऱ्याकडे व्यक्त करायच्या असतात. आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व मंत्री आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो होतो. आम्ही सर्वांनी आमच्या भावना मांडल्या. 10 मिनिटांत ज्या काही मनातील भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्यूशन देखील निघालं”, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
“राज्यात निवडणुका आहेत. निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्षांतराचे वारे फार मोठ्या प्रमाणात येतात. कुणी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, असं चालू होतं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही पक्षांतरे होते. त्यामध्ये पालघर, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा काही जिल्ह्यांमध्ये पक्षांतरातून पदाधिकारी घेण्याची चढाओढ चालू होती. त्यामुळे थोडीशी नाराजी आमच्या लोकांची होती. काही प्रमाणात त्यांच्या लोकांची नाराजी होती. ती नाराजी काय आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी समजून घेतली आणि तोडगा काढला”, असं प्रताप सरनाईक म्हणाल.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत अखेर निर्णय झाला
“असा निर्णय झाला की, महायुतीमधील घटक पक्षातील कुणीही कुठल्या पक्षातील नेते, पदाधिकारी, नगरसेवक घेऊ नये असा निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष आणि इतर मंडळी बसून निर्णय घेतील. सामोपचाराने तोडगा निघाला आहे. कुणीही कुणाला काहीही सुनावलेलं नाही”, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
“काही गोष्टी शिंदे आणि फडणवीस यांना विचारुन होत नाहीत. कळतनकळत काही गोष्टी घडतात. त्यामुळे विसंवाद होतो. तो विसंवाद होऊ नये, अशी सगळ्यांची भूमिका आहे, असं ठरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. कुणी सांगितलं की, मुख्यमंत्री भडकले? अशा काहीही वावड्या उठवल्या जातात. कुणी कुणावर वैतागलं नाही. सकारात्मक आणि गुण्यागोविंदाने सर्व निर्णय झालेले आहेत”, अशी देखील माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

