मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक केलं आहे. याचबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या दरम्यान अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची मुदत आता वाढवण्यात आली होती. याआधी ही मुदत १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत होती. पण निर्धारित मुदत आता वाढवण्यात आली आहे. आता महिला आपली ई-केवायसी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करु शकणार आहेत. कारण आता राज्य सरकारने ई-केवायसीची मुदतवाढ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
ई-केवायसी करताना महिलांच्या आधारकार्डशी लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. त्यानंतर महिलेच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधारकार्डवर लिंक असेलल्या नंबरवर दुसरा ओटीपी येतो. त्यानंतरच ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक महिलांच्या वडील किंवा पतीच्या मोबाईलनंबरवर ओटीपी येत नसल्याची तक्रार येत होती. यावरही राज्य सरकारने उपाय शोधला आहे. तसेच अशाप्रकारच्या अनेक समस्यांसाठीच ई-केवायसीसाठीची मुदत वाढवण्यात आल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेला याचा फटका बसू नये हा यामागचा प्रामाणिक हेतू सरकारचा आहे.
अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे. तसेच, ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील, असं महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.
या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे. याकरिता माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा