पुण्यानंतर आता अहिल्यानगरात जैन समाजाच्या जागेचा वाद पेटला आहे. आमदार संग्राम जगताप निर्दोष असल्याचा ट्रस्टी आणि भाडेकरूंनी दावा केला आहे. तर रवींद्र धंगेकर उद्या धर्मदाय आयुक्तांची भेट घेणार आहेत.
ट्रस्टींचा खुलासा, व्यवहारच नाही
“सदर जागा मंगूबाई होरा यांनी १९७५ साली जैन समाजाला दान केली होती. त्या वेळीच मृत्युपत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, त्या जागेवरील भाडेकरूंना जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत तिथे राहता येईल. त्यामुळे आजही गणेश गोंडाळ हे जागेचे कायदेशीर भाडेकरू आहेत. या जागेचा ना ताबा बदलला आहे, ना कोणताही व्यवहार झाला आहे. किरण काळे यांनी केलेले आरोप पूर्णतः खोटे आहेत”, असा खुलासा ट्रस्टी सुभाष मुथ्था यांनी केला.
भाडेकरूंचेही प्रत्युत्तर, ‘जागा माझ्या ताब्यातच’
“मी आजही त्या जागेचा भाडेकरू आहे. माझेच ऑफिस त्या ठिकाणी आहे. आमदार संग्राम जगताप कधीतरी माझ्याकडे भेट देतात. मात्र तेथील जागा त्यांचे कार्यालय नाही. किरण काळे यांनी मृत्युपत्रातील भाडेकरूंचा उल्लेख जाणीवपूर्वक लपवला आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला”, असा दावा भाडेकरू गणेश गोंडाळ यांनी केला.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी, वाचा संपूर्ण कार्यक्रम
धंगेकर नगरचे जैन समाजाचे ट्रस्टी आणि धर्मदाय आयुक्तांची भेट घेणार
दरम्यान, या प्रकरणात आता काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकरही मैदानात उतरले आहेत. “आमदार संग्राम जगताप यांनी जैन समाजाची जागा लाटली का? या संदर्भात आम्ही उद्या नगरचे जैन समाजाचे ट्रस्टी व धर्मदाय आयुक्तांची भेट घेणार आहोत. जागा विकताना कोणी दबाव आणला का? हेही आम्ही तपासणार आहोत. एक चांगल्या कामासाठी आम्ही किरण काळे यांना नक्कीच पाठिंबा देऊ. दादा गिरणी घेतली की लाटली हे सत्य बाहेर यायला हवे”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
मतदारयाद्यांमधील घोळ ते EVM, निवडणूक आयुक्तांना पत्रकारांच्या प्रश्नांनी घेरलं, दिनेश वाघमारेंनी काय-काय उत्तरे दिली?
राजकारण तापण्याची शक्यता
या खुलाशामुळे किरण काळे यांनी केलेल्या आरोपांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता त्यांच्या पुढच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादात राजकीय रंग गडद होत असून, संग्राम जगताप, किरण काळे, रवींद्र धंगेकर यांच्यातील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

