विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे ब्रँड धोक्यात आल्याने उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेनं विजय मिळवला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या खोणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना उबाठा पक्षाच्या ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन करुन ज्योती जाधव यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटलाचीसाठी शुभेच्छा दिल्या.
ज्योती जाधव यांच्या विजयात मनसेची छुपी साथ लाभली. शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. उद्धव ठाकरेंनी फोन करुन जाधव यांचं कौतुक केलं. हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या संघटित प्रयत्नांचा असल्याचं ठाकरे म्हणाले. पक्ष सदैव विकासासाठी कटिबद्ध असल्याचं ठाकरेंनी म्हटलं.
ज्योती जाधव बिनविरोध निवडून आल्या. त्यासाठी मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेशदादा पाटील यांनी पडद्यामागून मोलाची भूमिका बजावल्याचं जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितलं.
ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा कल्याण ग्रामीणमध्ये फडकल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. खोणी ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानंच निर्णय झाला. उद्धव ठाकरेंच्या नावाचा वापर करुन काही जण अपप्रचार करत असल्याचं शिंदेसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांनी सांगितलं.

