वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिल्याची सध्या राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा सुरु आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून अशा कुठल्याही चौकशीचे आदेश दिले असल्याचं वृत्त फेटाळलं. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले ही चांगली गोष्ट म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “पोलीस खातं हे बदमाशांचं खातं झालेलं आहे. साताऱ्यामधील महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणी पोलीस अधिकारीच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाप्रमाणेच डॉक्टरांच्या आत्महत्या संदर्भात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“दुसरीकडे सरकार ओबीसी आणि मराठा समाजाची फसवणूक करताना दिसत आहे. एकीकडे सरकार हैदराबाद गॅझेट संदर्भातील शासन निर्णय रद्द करू म्हणून ओबीसींना सांगत आहे. तर दुसरीकडे कोर्टामध्ये हा शासन निर्णय कसा खरा आहे अशी बाजू सरकार कोर्टामध्ये मांडत आहे. त्यामुळे सरकार ओबीसींची फसवणूक करत आहे”, अशीदेखील टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
“राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने खरिपाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर राज्य सरकारने 31 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. पण सरकारने सांगितलेला हा पॅकेजचा आकडा हा रतन खत्री यांच्या मटक्यासारखा वाटत आहे”, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
“जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच लागतील. बिहारमध्ये जर एनडीएचे सरकार आले तरच या निवडणुका लागू शकतात. जर बिहारमध्ये एनडीएचे सरकार नाही आले तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील की नाही? याविषयी देखील शंका आहे”, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
‘आरएसएसची नोंदणी दाखवा अन्यथा…’
“काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे आमच्या कार्यकर्त्यांवर आरएसएसकडून गंभीर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यावेळी आम्ही आरएसएस या संघटनेची नोंदणी दाखवा आणि त्याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर खुशाल गुन्हे दाखल करा, असे पोलिसांना म्हटले होते. पण पोलिसांनी आरएसएसच्या नोंदणी संदर्भात कसल्याही प्रकारची कागदपत्रे दाखवले नाहीत. त्यामुळे आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे आरएसएसच्य कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. पण आम्ही एवढ्यावर थांबणार नाहीत. आम्हाला आरएसएसच्या नोंदणी संदर्भात कागदपत्रे दाखवण्यात आले नाहीत तर येणाऱ्या काळात राज्यामध्ये आरएसएसच्या विरोधात प्रचंड मोठे आंदोलन उभारणार”, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

