• Sat. Jul 11th, 2026

    जनगणना-२०२७ च्या  पूर्वचाचणीसाठी सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन  – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 28, 2025
    जनगणना-२०२७ च्या  पूर्वचाचणीसाठी सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन  – महासंवाद


    मुंबई, दि. २८ : भारत सरकारने २०२७ मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे. या जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, त्याची पूर्वचाचणी दि. १० ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  केली जाणार आहे. जनगणनेकरिता नियुक्त केलेले प्रगणक व पर्यवेक्षक, जे माहिती संकलनासाठी वाटप केलेल्या क्षेत्रातील घरे व कुटुंबाला भेट देतील, त्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन संचालक डॉ. निरुपमा जे. डांगे, जनगणना संचालनालय-महाराष्ट्र, मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

    जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घर यादी व घर गणना हा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर, २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी, २०२७ मध्ये पार पडणार आहे. ही जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदीनुसार ही जनगणना केली जाते.

    या जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या सर्व पैलूंचा समावेश असेल. जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याची म्हणजे घरयादी व घर गणनेची पूर्वचाचणी दि.१० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाईल, तसेच स्व-गणना करण्याचा पर्याय देखील दिनांक १ ते ७ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत उपलब्ध असेल.

    महाराष्ट्र राज्यातील घर यादी व घर गणनेची पूर्वचाचणी निवडक तीन नमुना क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे. पूर्वचाचणीकरिता निवडलेली नमुना क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तहसील आणि बृहन्मुंबई महानगरपालिकच्या एम/वेस्ट प्रभागातील नमुना क्षेत्र, या नमुना क्षेत्रामध्ये होणा-या जनगणना पूर्वचाचणीसाठी जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदी लागू राहतील.

    नमुना क्षेत्रांतील सर्व रहिवाशांना व सर्वसामान्य जनतेने जनगणनेकरिता नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक आपल्या परिसरात भेट देऊन माहिती गोळा करत असताना त्यांना अचूक व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे,असे आवाहन संचालक डॉ. निरुपमा जे. डांगे, भा.प्र.से., संचालक, जनगणना संचालनालय-महाराष्ट्र, मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

    ००००

    वंदना थोरात/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed