Pandharpur News: पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू करण्यात आलं आहे. आज श्रींचा पलंग काढण्यात आला असून, 9 नोव्हेंबरपर्यंत भाविकांना जलद दर्शनाची सोय उपलब्ध असणार आहे. भाविकांच्या गर्दीचा विचार करून दर्शन व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक 09 नोव्हेंबर (प्रक्षाळपूजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे.
दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक आहेत, या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. पंरपरेनुसार श्रींचा पलंग काढल्याने दैनंदिन 24 तास मुखदर्शन व 22.15 तास पदस्पर्शदर्शन उपलब्ध होत आहे. याशिवाय, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून व जागोजागी एलईडी टीव्हीद्वारे लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
संपूर्ण यात्रा कालावधीत भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा व व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. तसेच या यात्रा कालावधीतील श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असून, श्रींचा पलंग काढणे, एकादशीच्या सर्व पूजा, महानैवेद्य, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला, प्रक्षाळपूजेचे योग्य ते नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
दरम्यान, मागील आषाढी यात्रेदरम्यान भाविकांच्या गर्दीचा अनुभव लक्षात घेऊन, यंदाच्या कार्तिकी यात्रेचे नियोजन करण्यात आलं आहे. दर्शन रांगेच्या व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं असून भाविकांना सुलभ, सुव्यवस्थित आणि जलद दर्शनाची सुविधा मिळावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

