• Fri. Sep 4th, 2026

Pune News : वडिलांवर हात उचलणारा ते बापटांना मारहाण करणारा; पुण्यात थरार घडवणाऱ्या संतोष चव्हाणची धक्कादायक पार्श्वभूमी

पुण्यात डीजेवर बंदी घालण्याची मागणी करणारे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या तीन तासात अटक केली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपीची आता गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यात ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा घेऊन गणेशोत्सवात डीजेला बंदी घाला अशी मागणी करणारे विद्यानंद बापट यांच्यावर आज सकाळी पुण्यातील टिळक रस्त्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणारा माथेफिरू रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आता समोर आली आहे. विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर पुणे क्राईम ब्रँचने अवघ्या तीन तासात संतोष चव्हाण याला अटक केली आहे. संतोष चव्हाण हा पुण्यातील राऊतवाडी भागातील रहिवासी आहे.

एकीकडे हातात बी.कॉमची पदवी, पोटापाण्यासाठी टिंबर मार्केटमधील एका छोट्या इलेक्ट्रिक दुकानात नोकरी, तर दुसरीकडे गुन्हेगारीच्या अंधाऱ्या विश्वात गुरफटलेलं मन… विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा खरा चेहरा आता पोलिसांच्या तपासात उघड झाला असून, समोर आलेली माहिती चक्रावून टाकणारी आहे.

संतोष चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार

विद्यानंद बापटांना मारहाण करणारा हा तरुण कोणताही नवखा गुन्हेगार नसून, पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी निघाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या हातांनी जन्मदात्या बापाला सांभाळायचं, त्याच हातांनी संतोषने तीन वर्षांपूर्वी आपल्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. मुलाच्या या कृत्याने तुटलेल्या वडिलांनी त्याच क्षणी त्याच्याशी असलेले रक्ताचे नाते कायमचे तोडून टाकले होते.

संतोषवर 5 ते 6 गंभीर गुन्हे

पुण्यात संतोष चव्हाण याच्यावर कट रचणे, प्राणघातक हल्ले आणि मारामारी यांसारखे 5 ते 6 गंभीर गुन्हे आधीच नोंद आहेत. यापूर्वीही अनेक गंभीर प्रकरणांत पुणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या, वाणिज्य शाखेची पदवी असूनही तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता.

बापटांना मारहाण केल्यानंतर मोबाईल केला बंद

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केल्यानंतर संतोषने पोलिसांच्या रडारवरून गायब होण्यासाठी तातडीने स्वतःचा मोबाईल फोन बंद केला. मात्र, पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाने अवघ्या तीन तासांच्या आत संतोष चव्हाणचा माग काढला आणि त्याला बेड्या ठोकल्या. या संपूर्ण प्रकरणात पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

विद्यानंद बापट यांना मारहाणीच्या घटनेवर अनेकांकडून संताप व्यक्त

दरम्यान, विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आलेल्या घटनेवर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. फेसबुकवर अनेकांकडून या घटनेवर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाण याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. विद्यानंद बापट यांना मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेवरुन व्यक्ती स्वातंत्र्यांचा प्रश्न उपस्थित केला जातोय. अनेकांनी पुणे पोलिसांकडे आरोपीवर कठोर कारवाई केली आहे. त्यानुसार पोलिसांनी देखील अवघ्या तीन तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.