• Tue. Jun 16th, 2026

    राज्य सरकारकडून आमदारांच्या निधीवाटपात दुजाभाव? विजय वडेट्टीवार यांचा धक्कादायक आरोप

    राज्य सरकारकडून आमदारांच्या निधीवाटपात दुजाभाव? विजय वडेट्टीवार यांचा धक्कादायक आरोप

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निधी वाटपावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून स्थानिक आमदारांना 5 कोटींचा निधी दिला जात आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : “राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारने ठरवलेल्या निकषांमुळे आणि राज्य सरकारकडून खरेदीसाठी मंजुरी न मिळाल्याने शेतकऱ्यांना कापसाला योग्य दर मिळत नाही. अशा परिस्थितीत सत्ताधारी आमदारांना कोट्यवधींचा निधी दिला जात आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही का?”, असा संतप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर तीव्र टीका केली. “महायुती सरकारमधील पहिल्यांदाच निवडून आलेल्या सुमारे 50 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा आमदार निधी देण्यात आला आहे. एकीकडे राज्यातील आदिवासी विकास विभाग आणि मागासवर्गीय कल्याण विभागाचा निधी वळवला जात आहे, राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे, आणि दुसरीकडे सत्ताधारी आमदारांवर निधीची खैरात केली जात आहे. हे केवळ विरोधकांवर अन्याय नसून जनतेवरही अन्याय आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले.

    “राज्य सरकारचा उद्देश सर्वांगीण विकासाचा नसून निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने आमदारांना निधी वाटला जात आहे. विरोधी आमदार आणि त्यांच्या मतदारसंघाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

    ‘लाडकी बहिण’ या योजनेवर देखील त्यांनी सरकारला धारेवर धरले. “विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली होती. पण आता या योजनेत घोटाळे उघडकीस येत आहेत. या योजनेत अनेक पुरुषांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे. सुरुवातीपासून पारदर्शकता का ठेवली नाही? आता सरकारला या योजनेचा आर्थिक भार जाणवतोय म्हणून नव्या अटी-शर्ती घालण्यात येत आहेत,” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

    “नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर सरकार ही योजना बंद करणार आहे. आज मंत्री कितीही आश्वासनं देत असले तरी निवडणुका संपताच लाडकी बहिण योजना थांबवली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

    महाविकास आघाडीत मनसेचा प्रवेश होणार का? या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. “लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी होती. तर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी. स्थानिक निवडणुकांमध्ये आघाड्या स्थानिक पातळीवर ठरवल्या जातील. नव्या पक्षांच्या प्रवेशाबाबत निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा