Pune News: पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आमदार सुनील शेळके यांच्यानंतर आता ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना पक्षशक्ती वाढवण्याचं आवाहन केलं आहे.
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार बोलून दाखवण्याबरोबरच आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचे कान देखील टोचले आहेत. ‘स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर करू नका, सर्वांनी पक्षशक्ती वाढवण्यासाठी कामाला लागा. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे,’ असं वळसे पाटील म्हणाले आहेत.
केंद्र आणि राज्य दोन्हीही सरकारे एकाच विचारधारेची असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी निधी आणण्याचे काम अधिक प्रामाणिकपणे करतील. कार्यकर्त्यांनी नकारात्मक बोलणे बंद करून जनतेचे सेवक म्हणून काम करावं, असं देखील वळसे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, याच मेळाव्याला माजी खासदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी पक्षातील गट-तटावरून उघड नाराजी व्यक्त केली आहे. ‘निवडणुकीत संधी देताना निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या. स्थानिक गाव पातळीवरील गट- तट पक्षाला हानी पोहोचवतात, त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावं,’ असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.

