Kolhapur News : कोल्हापुरातील महिला निरीक्षणगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी आज शुक्रवारी सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासन आणि कर्मचारी खडबडून जागे झाले आहेत.
दोन महिन्यांपासून निरीक्षणगृहात
कोल्हापुरातील शासकीय महिला निरीक्षण गृह या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या या महिलांना नैराश्य आल्याची प्राथमिक माहिती या महिलांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. करवीर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी एका रिसॉर्टवरील छाप्यात या महिलांना अश्लील नृत्य आणि देहविक्री प्रकरणी ताब्यात घेतलं होतं. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यानंतर त्यांना महिला निरीक्षणगृहात ठेवण्यात आलं. तब्बल दोन महिने जामीन अर्ज वारंवार फेटाळल्याने त्या निराश झाल्याचं सांगितलं जात आहे.
Raigad Crime : बनावट नोटा प्रकरणातील गूढ वाढलं! भूषण पतंगेचा मृत्यू व्हेंटिलेटरवर की पोलिसी डाव?, 17 तासानंतरही पोस्टमार्टम नाही
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिला सुटकेच्या प्रतीक्षेत असून, गणेशोत्सव, दसरा गेल्यानंतर आता दिवाळीच्या आधी घरी परतण्याची आशा त्यांनी धरली होती. मात्र निर्णय मिळण्यात झालेल्या विलंबामुळे त्यांनी खचून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेनंतर तातडीने पोलिस चौकशी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत लवकरच होणार सुनावणी
दरम्यान, या प्रकरणातील सहा महिलांची बाजू मांडणारे ॲड. गुलाम खान यांनी सांगितलं की, ‘नातेवाईकांनी न्यायालयात कस्टडीसाठी अर्ज दाखल केला आहे. पुढील सुनावणी 29 ऑक्टोबरला तर अंतिम आदेश 30 ऑक्टोबर रोजी येण्याची शक्यता आहे.’ त्यांनी पुढे सांगितलं, ‘या महिला वारंवार आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची आणि दिवाळी एकत्र साजरी करण्याची इच्छा व्यक्त करत होत्या. मात्र सुटकेबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने त्या मानसिक तणावात गेल्या आणि कदाचित नैराश्यातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.’
Washim News : चिमुकल्या देवांशीवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी, आईने वाचविले मुलीचे प्राण
दरम्यान या घटनेनंतर सुधारगृहातील सुरक्षा व्यवस्था, कैद्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित सुविधा आणि महिला कैद्यांसाठी उपलब्ध मानसोपचार सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

