रिक्षाचालक मोहन गणपती चंदनशिवे यांनी स्वतःहून अर्थ पिंपरे यांच्याशी संपर्क साधत त्याचा लॅपटॉप परत केला
अर्थ पिंपरे हा विद्यार्थी बुधवारी संध्याकाळी एमआयटी कॉर्नरवरून वाघोलीकडे जात होता. प्रवास संपल्यावर तो रिक्षेतून उतरला, मात्र घाईत त्याची लॅपटॉप असलेली बॅग रिक्षेतच राहिली. काही वेळाने लक्षात येताच त्याने परत धाव घेतली, पण रिक्षाचा क्रमांक लक्षात नसल्यामुळे तो असहाय झाला.
यानंतर अर्थने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कृष्णा बाबर आणि त्यांची टीमने परिसरातील सीसीटीव्ही तपास सुरू केला. तोपर्यंतच एक आनंदाची बातमी मिळाली रिक्षाचालक मोहन गणपती चंदनशिवे यांनी स्वतःहून अर्थ पिंपरे यांच्याशी संपर्क साधला.
मोहन चंदनशिवे यांना अर्थने गुगल पे द्वारे भाडं दिलं होतं. त्या ट्रान्झॅक्शन आयडीच्या आधारे त्यांनी मित्राच्या मदतीने विद्यार्थ्याचा इन्स्टाग्राम अकाऊंट शोधलं आणि त्याला मेसेज करून बॅग परत दिली. लॅपटॉप आणि इतर वस्तू सुरक्षित अवस्थेतच होत्या.
ही प्रामाणिक आणि हृदयस्पर्शी कृती पाहून लोणी काळभोर पोलिसांनी मोहन चंदनशिवे यांचा सन्मान करत गौरव केला. चंदनशिवे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा दृष्टिकोन हे समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे, असं निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितलं. अनेकदा चोरीच्या आणि फसवणुकीच्या बातम्यांमध्ये माणुसकी हरवते, पण मोहन चंदनशिवे यांच्या या कृतीने हे सिद्ध केलं अजूनही समाजात चांगुलपणाचं बीज जिवंत आहे.
खडकीत दागिने चोरीला
दुसरीकडे, पुण्यातील खडकी भागातील पाटील इस्टेट परिसरात उघड्या दरवाजातून घरात शिरत चोरट्यांनी दोन लाख ८७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. ३४ वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार महिला घरात असताना मुख्य दार उघडे होते. त्याच वेळी चोरट्यांनी संधी साधून घरात प्रवेश करत कपाटातील दागिने चोरून नेले.

