Traffic Jam on Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सलग चौथ्या दिवशी वाहतूककोंडीत अडकला होता. ठाणे-घोडबंदर मार्गाच्या दुरुस्तीमुळे वाहनांचा ताण वाढला, ज्यामुळे वाहनचालकांना 9 ते 10 तास कोंडीत अडकावे लागले.
ठाणे-घोडबंदर मार्गाच्या दुरुस्ती कामामुळे अवजड वाहनांची वाहतूक चिंचोटी, भिवंडी व अन्य पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली होती. परिणामी, वाहनांच्या रांगा थेट राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचल्या. हे काम 14 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल असे जाहीर केले होते; परंतु प्रत्यक्षात काम 15 ऑक्टोबरला पहाटे संपुष्टात आले. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजता वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. मात्र महामार्गावरील कोंडी बुधवार दुपारपर्यंत होती. त्यातच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे कोंडी आणखी वाढली. परिणामी, अवघ्या 10 मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना दोन तास लागत होते. या कोंडीचा फटका शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना बसला.
अंबरनाथमध्ये महायुतीत वादाची ठिणगी, आमदार बालाजी किणीकरांचा भाजपला इशारा
शाळकरी विद्यार्थ्यांची सुटका
मंगळवारी झालेल्या कोंडीत 10 ते 12 शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसगाड्या अडकल्या होत्या. यात काही मुंबईतील सहलीसाठी आलेल्या बसगाड्यांचा समावेश होता. कामण-चिंचोटी येथील विद्यार्थ्यांना बापाणे येथून नदीतून वाट काढून घरी पोचवण्यात आले, तर काही मुलांना सामाजिक कार्यकर्ते सुशांत पाटील यांच्या माध्यमातून सुटका करण्यात आली.
कितीही काही केलं तरी नवी मुंबई पालिका निडणुकीत दिसेलच! श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना टोला
वनमंत्री गणेश नाईक अडकले
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कोंडीत बुधवारी राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक अडकले. अखेर त्यांना विरारच्या मारबळ ते पालघरच्या जलसार जेटीचा आधार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातां पोहोचावे लागले. पालकमंत्री सकाळी साडेसहा वाजता आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाहून पालघरला निघाले. मात्र कोंडीमुळे १० वाजता सुरू होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक तब्बल पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. गुजरात राज्यात या महामार्गावरून दररोज हजारो वाहने जातात, परंतु गुजरात पोलिस विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करतात. त्यामुळे गुजरातमध्ये कोणताही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचा प्रयत्न करत नाही; मग महाराष्ट्रातील पोलिस कारवाई करण्यास का मागे आहेत, असा प्रश्न नागरिक आणि दोन्ही जिल्ह्यांचे वाहनचालक विचारतात.

