Election Commission News: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदारयाद्यांमधील त्रुटींवरून राज्यातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी नोंदवल्या. राज ठाकरे यांनी मतदारयाद्या मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली, तर उद्धव ठाकरे यांनी VVPAT चा मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केला.
बैठकीत आपले मुद्दे मांडताना राज ठाकरे म्हणाले की, “निवडणुका राजकीय पक्ष लढवतात. मग राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही? मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. तसंच आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाल्याची माहिती आहे.
दरम्यान, ” बाळासाहेब थोरात 8 टर्म 80-90 हजार मतांच्या फरकाने निवडणूक जिंकतात आणि यंदा लाखाने पडले, हे कसं शक्य आहे?” असा सवाल या बैठकीत राज ठाकरेंनी उपस्थित केला. त्यावर निवडणूक आयोगाचे दोन्ही अधिकार निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले. “मतदार याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू. मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्ही तयार नाही ते आणि निवडणूक पुढे ढकला,” असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
उद्धव ठाकरेंचाही पारा चढला
मतदारयाद्यांविषयीच्या संभ्रमावर बोलताना राज्य निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. “चोक्कलिंगम म्हणतात काही जबाबदारी आमच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही, मग आम्ही कुणाशी बोलू? त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असेल तर निवडणुका कशाला घेता? ड्रायरेक्ट election for selection करून टाका,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला.

